पुणे : राज्यातील पहिले पुण्यातील दाम्पत्य कोरोना बाधित चाचणी झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यात त्यांची मुलगी, सहप्रवासी व कॅब चालक हे तिघेही पॉझिटिव्ह आले होते. नायडू हॉस्पिटलमध्ये १४ दिवसाच्या उपचारानंतर बरे होऊन हे पाचही जण घरी परतले. त्यांच्या गेल्या दोन दिवसांतील दोन्ही तपासणी निगेटिव्ह आल्यानंतर आरोग्य प्रशासनाने त्यांना तसे प्रमाणपत्र दिले. गुलाबपुष्प देत टाळ्याच्या कडकडाटात हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी या पाच जणांना निरोप दिला.

होळीच्या दिवशी हे दांपत्य कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर त्यांत आणखी तीन जणांना लागण झाली होती. त्यामुळे परिसरात भीतेचे वातावरण पसरले होते. १४ दिवसाच्या उपचारानंतर ते बरे झाले. रुग्णवाहिका कधी येते, याची वाट पहात त्यांच्या सोसायटीतील साडेतीनशे सदनिकांतील रहिवासी थांबले होते. हे दांपत्य दुपारी तेथे पोहोचताच, सोसायटीधारकांनी बाल्कनीत थांबून टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले.

दुबईला पर्यटनासाठी गेलेले ४० जणांचे पथक १ मार्चला मुंबईला परतले. या पथकामधील पुण्यातील एकाला त्रास होऊन लागल्याने आठ मार्चला रुग्णालयात दाखल केले. ते व त्यांची पत्नी यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यापाठोपाठ त्या दाम्पत्याची मुलगी, त्यांना मुंबईहून पुण्याला घेऊन येणारा वाहन चालक आणि एक सहप्रवासी यांनाही ९ मार्चला नायडू रुग्णालयात दाखल केले. राज्यातील पहिले पाच कोरोनाग्रस्त पुण्यात सापडल्याने महापालिका आणि जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. पुण्यातील रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत पुणेकर कोरोनाच्या छायेखालीच वावरत आहेत.

या सर्वांवर महापालिकेच्या डॉ.नायडू रुग्णालयात गेले दोन आठवडे उपचार सुरू आहेत. पहिल्यांदा दाखल झालेले पाचजण बरे होऊन घरी परतण्याच्या तयारीत आहेत. गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर पहिले दोघे घरी परत पोहोचले.त्या दांपत्यांनी रुग्णालयातील डॉक्टर व सर्व कर्मचारी यांचे मनापासून आभार मानले.
या दाम्पत्यास रुग्णवाहिकेतून पोलिस बंदोबस्तात धायरीतील त्यांच्या राहत्या घरी पोहोचविले. यावेळी रुग्णवाहिकेच्या पुढे पोलिस गाडी होती. रुग्णवाहिका त्यांच्या सोसायटीच्या गेटवर पोहोचल्यानंतर सोसायटीतील नागरिकांनी गॅलरीमध्ये येऊन टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. बऱ्याच जणांनी दूरध्वनीवरून त्यांना शुभेच्छा दिल्या. हे दाम्पत्य घरामध्येच पुढील काही दिवस कोणासही न भेटता विलग राहणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

नागरिकांनी किमान काही दिवस तरी घरी बसून, हा आजार परतवून लावावा,’ असे आवाहन करण्याबरोबरच ‘माझ्यासाठी हा काळ खूप कठीण होता आणि या दिवसात आलेले अनुभव आणि नागरिकांनी केलेले सहकार्य यावर काही दिवसांनी लिखाण करणार आहे, याशिवाय यासंदर्भात एक व्हिडीओ तयार करून तो प्रसारित करणार असल्याचे उपचारानंतर घरी सोडलेल्या व्यक्तींनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा