पुणे : एकीकडे लाॕकडाउन तर दुसरीकडे बाजार बंद अशा दुहेरी संकटामुळे लोकांत चिंतेचे वातावरण आहे. शहर आणि उपनगरातील काही किराणा दुकांनात मालाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मार्केटयार्डातील भुसार बाजार उद्या (शुक्रवारी) पासून सुरु ठेवणार असल्याची माहिती पुणे मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

देशात आता लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिक जास्त माल खरेदी करत आहेत. त्यामुळे किरकोळ विक्री करणाऱ्या किराणा दुकानांमधील माल संपत आहे.अशा वेळी जादा दराने माल सुद्धा विकण्याची शक्‍यता आहे.असे प्रकार होऊ नये म्हणून बुधवारी दुपारी पुणे मर्चंट चेंबरच्या कार्यकारीणीची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत भुसार बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बाजार बंद ठेवला तर मजुरांचा रोजगार थांबेल. ग्राहकांना अधिकच्या दराने किराणा मालाची खरेदी करावी लागेल. शहर आणि जिल्ह्यात जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल. त्यामुळे बाजारात दर ही वाढतील यामुळेच भुसार बाजार तातडीने सुरू करण्याची मागणी या बैठकीत व्यापाऱ्यांनी केली. मार्केट यार्ड भुसार बाजारात काही वेळ ठरवून त्या वेळेत फक्त सुरू ठेवावा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होणे गरजेचे आहे हमाली करणाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करणे गरजेचे आहे, जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करताना पोलिसांनी चर्चा करून नियम ठरवावे व सहकार्य करावे अशी भूमिका ज्येष्ठ व्यापारी अभय संचेती यांनी मांडली.त्याचवेळी पोलिस कुठल्याही प्रकारे अडवणूक करणार नाहीत ना याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी तसेच कुठल्याही व्यापाऱ्याला तसेच त्याच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना सुध्दा संरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका बैठकीत मांडली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती व पोलिस प्रशासनाशी सुद्धा चर्चा झाली. या चर्चेनंतर अखेर शुक्रवारपासून नियमितपणे भूसार बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात असल्याचेही ओस्तवाल यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा