ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे

जगभरात कोरोणाचे थैमान सुरू आहे. भारतात गेले काही दिवसापासून त्याचा प्रसार वाढत आहे. त्या पार्श्वभूमिवर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. प्राथमिक ते उच्चशिक्षण महाविद्यालयांना 31 मार्च पर्यंत शाळांना सुटट्या दिल्या आहेत.त्या परीक्षा रदद केल्यांने आणि शाळांना सुटटी दिल्यांने प्रसाराचा धोका काही प्रमाणात निश्चित कमी झाला आहे.मात्र परीक्षेशिवाय पास करायचे म्हणजे शिक्षणांला काय अर्थ आहे ? असा सवाल केला जाऊ लागला आहे.या एका निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे सोडले आहे का ?. शिक्षकांचे काम कमी झाले आहे. यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.असा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. खरच आपली शिक्षण व्यवस्था परीक्षेशिवाय पुढे जाऊ शकणार नाही का ? शिक्षणांत परीक्षाच महत्वाची असणार असेल, तर शिक्षणाचे मोल कधी अधोरेखित होणार आहे. शिक्षण आणि परीक्षा यांचा जोडलेला संबंध आणि त्यामुळे परीक्षांनी शिक्षणाचा घोटलेला गळा याचा विचार आता करण्याची वेळ आली आहे.

शिक्षणाच्या प्रक्रियेत शिकणे,शिकविणे आणि मूल्यमापन या शैक्षणिक त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत. त्या तीनही बाजू महत्वाच्या आहेत.त्या एकमेकापासून दूर करता येत नाही. त्यातील मूल्यमापन ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. त्यातील परीक्षा हे एक साधन आहे.त्यामुळे मूल्यमापन म्हणजे केवळ परीक्षा नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. मूल्यमापनाचेव्दारे आपण विविध उददीष्टांची, विद्यार्थी विकासाची व अध्ययनाची निष्पत्ती कितपत साध्य झाली आहे हे पडताळून पाहात असतो. अध्ययनाचा परिणाम किती साध्य झाला आणि त्यातील किती आणि कोणती उददीष्टे कितपत साध्य झाल्या आहेत हे मापनाचे परीक्षा हे अनेक साधनापैकी एक साधन आहे हे लक्षात घ्यायला हवे. ते काही अंतिम साधन नाही.

शाळा स्तरावर प्रत्येक इयत्तेत आणि प्रत्येक विषयात विद्यार्थ्यांना किमान काय यायला हवे हे त्या त्या इयत्तेच्या विशेष उददीष्टात नमूद केलेले असते. त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास , श्रवण, भाषण, वाचन, लेखन, गणन, स्वअभिव्यक्ती, मत तयार करणे, विवेकशीलता निर्माण करणे, गाभाघटकाच्या अपेक्षा, मूल्य, जीवनकौशल्य यासारख्या अनेक गोष्टी शिक्षणाच्या अभ्यासक्रमातून अपेक्षित केलेल्या असतात. त्या कितपत साध्य झाल्या आहेत? त्यात कोणते अडथळे आहेत ? त्यावर मात करीत पुनर्भरण कसे करता येईल. त्यासाठी अध्ययन अनुभव कोणते द्यावेत यादृष्टीने मूल्यमापन केले जात असते.मूल्यमापनातून विद्यार्थ्याचे शिकणे किती परिणामकारक होत आहे याचा अंदाज बांधण्याच्या दृष्टीने उपयोग होतो. एका अर्थांने मूल्यमापन म्हणजे विद्यार्थी कोठे पोहचा आहे हे पाहाणे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना किती जाणून घेत अध्ययन अनुभव दिले आहेत .ते कितपत यशस्वी झाले आहेत हे पाहाणे असते.त्याचबरोबर परीक्षेतून शिक्षणांची सर्व उददीष्टांचे मोजपाप करता येईल का याचा विचार करायला हवा. आता एखाद्या विद्यार्थ्याला उत्तम वाचता येते, त्याचे ऐकणे व भाषण कौशल्य विकसित झाले आहे ,त्याची विचारप्रक्रिया, विचाराची दिशा, दृष्टीकोन हे समग्रपणे लेखी परीक्षेतून कसे मापले जाणार आहे हा प्रश्न आहे. लेखी परीक्षेतून लेखी अभिव्यक्ती होईल.त्यातून काहीशी आकलन व मांडणी तपासता येईल.मात्र शिक्षणांतील सर्वच कौशल्य आणि व्यक्तीमत्वाचे कंगोरे तपासता येणे अशक्यच आहे.त्यामुळे शिक्षण आणि परीक्षा यांचे दृढ नाते म्हणजे शिक्षणांचे ध्येय आणि उद्दीष्टे न जाणणे आहे. शिक्षणांचा विचार व्यापक पातळीवर करण्याची निंतात गरज निर्माण झाली आहे.

विद्यार्थी शाळेत येतो ते केवळ वाचन, लेखऩ, गणन आणि पाठांतर करण्यापुरता असाच जणू समज झाला आहे. त्यामुळे या गोष्टी फक्त लेखी परीक्षेतून मापल्या जातात. त्या मापल्या गेल्या, की झाले शिक्षण यशस्वी. मुळतः शिक्षण आपण का घेतो ? याचा विचार करण्याची गरज आहे.शिक्षणांतून माणूस घडवायचा असतो. जगण्यास समर्थ बनवायचे असते.त्यातून सामाजिक व्यवहाराला समर्थ करणे असते.व्यक्तीमत्वाचा समग्र विकास आणि विवेक निर्माण करणे असते.या गोष्टी शिक्षणांतील विविध विषयाच्याव्दारे आणि सातत्यपूर्णतेने देण्यात येणा-या अध्ययन अनुभवाच्याव्दारे सुरू असते.विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतो. ज्ञान निर्माण करण्यासाठी त्याला समर्थ केले जाते. त्याची विचारप्रक्रिया समृध्दपणे करण्यासाठीची दिशा देणे घडते.त्याने कितपत जीवनाला समृध्दकरण्याचे शिक्षण आणि कौशल्य प्राप्त केले आहे.ज्ञानाची प्रक्रिया करण्यात कितपत यशस्वी झाला आहे.विचारप्रक्रिया कशी करतो आहे या गोष्टी तपासल्या जाणे महत्वाचे आहे.यातून शिक्षण घेऊन माणूस समर्थ बनला तर शिक्षण झाले असे समजावे.अन्यथा शिक्षणांची प्रमाणपत्र घेऊन शिक्षण न झालेली माणंस आपल्या भोवताली काही कमी नाहीत.त्यामुळे वर्षभर विद्यार्थी शाळेत असतात.त्यांचे मूल्यमापन शिक्षक विविध मार्गाने करीत असतात .त्या करीता सातत्यपूर्ण सर्वकंष मूल्यमापनाचेव्दारे आठ प्रकारचे साधन आणि त्या अंतर्गत विविध प्रकारची तंत्रे आहेत.त्या आकारिक मूल्यमापनाचेव्दारे करण्यात आलेले मापन कितपत योग्य झाले आहे. त्याचा पुरावा म्हणून संकलित मूल्यमापनाचा विचार केला जातो.त्यामुळे शिक्षणाचा विचार परीक्षेपुरता करण्याची मानसिकता सोडायला हवी.

परीक्षा नाही म्हणून अभ्यास करणार नाही ही भिती खरी आहे.पण याचा अर्थ जीवनभर शिक्षणाचे उददीष्टाचे काय केले हा प्रश्न अनुत्तरीत राहातो.शाळेत आहोत तोवर अभ्यास करायचा आणि शाळा सुटली की अभ्यास थांबवायचा हा धोका भविष्यासाठी देखील असतो . दहावी आणि बारावीच्या वर्गात अधिक गंभीरपणे अभ्यास करायचा असतो. हे आमच्या शिक्षणांच्या व्यवस्थेने बिंबवले आहे. शिक्षण जीवनभर करायचे असते. त्या करीता जीवनभर अभ्यास करायचा असतो हे आपण विसरत चाललो आहोत.आईन्स्टाईन स्वतःला भौतिकशास्त्राचे विद्यार्थी म्हणत होते याचा अर्थ काय ? तर ते जीवनभर अभ्यासाची प्रवृती दर्शवत होते.अलिकडे पाठयपुस्तकातील एखादा पाठ,प्रकरण शिकतांना ते किती मार्काला आहे याचा विचार अगोदर केला जातो.शिक्षकांबरोबर विद्यार्थी देखील तो पाठ कसा अभ्यासायचा हे देखील त्याच्या असलेल्या गुणांवर अवंलबून ठेवतो.जर संत तुकारामांचा अभंग दोन मार्काला असेल तर तुकारामांचा विचार,अभंग अभ्यासायाची गरज नाही.संत तुकारामांच्या विचाराचे मूल्य मार्कावर ठरते. त्यांचा विचार आणि दृष्टी जीवनाला उपयोगी असणार आहेत याचा विचार रूजविण्यात आम्ही कमी पडलो हे समजावून घेणार आहोत का नाही ? कोणतेही शिक्षण हे परीक्षेच्या मार्कावर ठरत असेल, तर शिक्षणात विचार आणि प्रक्रिया ,दृष्टीकोन रूजविण्यात कमी पडलो आहोत. ही जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवायला हवी.उलट जगणे आणि शिकणे यांचे नातेही अधोरेखित करण्याची गरज असते.पुस्तकातून मिळणारे शिक्षणाचा उपयोग जीवनाशी जोडण्यात आपल्याला यश आले तर विद्यार्थी परीक्षेशी जोडलेले नाते सोडून जगण्यासाठी अभ्यास करू लागतील यात शंका नाही. वर्गात आंतरक्रिया करतांना अनेकदा हा घटक,उपघटक परीक्षे करीता महत्वाचा आहे असे म्हटले जात असतांना ,हा घटक ,उपघटक ,पाठातील एखादा विचार जीवनांसाठी उपयोगी आहे.जीवन व्यवहाराशी जोडून शिकविण्याचा प्रयत्न केला जातो का ? तसा प्रयत्न झाला असेल , तर परीक्षेकरीता शिक्षण ,परीक्षेकरीता अभ्यास हा विचार काळाच्या ओघात अधिक दृढ झालेला पाहावयास मिळाला नसता. प्रो.यशपाल यांनी शिक्षण हे जीवनाभिमुख असले पाहिजे यासाठी आग्रही भूमिका ठेवली होती.पण ती भूमिका प्रशिक्षणात आणि प्रशिक्षण मार्गदर्शिकेत दिसत असली तरी परिणामकारक रित्या वर्गाच्या प्रक्रियेत येऊ शकली नाही हे मान्यच करावे लागेल .त्यामुळे परीक्षा नाही असे म्हणतांना मुले अभ्यासापासून तुटतील ही शंकाही शिक्षणांचे अपयश अधोरेखित करते यात शंका नाही.

त्यात अलीकडे डिजीटल क्रांतीच्या युगात व्हॉटसअप अभ्यासाचे पेव सुटले आहे.खरच विद्यार्थ्यांना जगण्याचे मिळणारे अनुभव हे शिक्षण नाही का.. ? वर्तमानातील परीस्थिती नेमकी काय आहे ? कशामुळे ही परीस्थिती निर्माण झाली आहे? .या परीस्थितीला सामोरे जातांना काय करायला हवे ? या परीस्थिवर मात करतांना कोणत्या अडचणी येता आहेत ? त्या का निर्माण होता आहेत ? सरकारने केलेले प्रयत्न,त्या प्रयत्नातून काय आणि कशी मात करता येणार आहे.नागरीकांचा प्रतिसाद कसा असायला हवा.तो तसा का मिळत नाही या सारखे अनेक गोष्टी शिकण्यास मिळणार आहे.या बाबतचा विचार करतांना स्वतःला संयमी ठेवणे.घरात राहाणे म्हणजे नेमके काय आहे ? त्यावर मात करण्यासाठी आणि वेळेचा सदपयोग करण्यासाठीचे उपाय शोधणे त्या संदर्भात विचार करणे.घरात आई बाबांना कामात मदत करणे.स्वयपांक करून पाहाणे.त्यात मदत करणे.त्यासाठीचा अंदाज बांधने.पशूची निगा राखणे यासाऱख्या गोष्टी करावयास मिळणे. गप्पा मारणे,गोष्ट सांगणे,ऐकणे , निरिक्षण करणे , घरात चित्र काढणे,पुस्तके वाचने,वर्तमान पत्र वाचने,त्यातील सदरे त्यांची माहिती या सर्व गोष्टी अभ्यासाच्या नाहीत का ?.या गोष्टी करण्यात विद्यार्थ्यांना अधिक रस असतो.त्यांना ते आवडते.त्यामुळे त्या गोष्टी करू देणे महत्वाचे आहे.केवळ पुस्तक आणि त्यातील माहिती,ती माहिती आठवून पुन्हा सांगणे हाच अभ्यास का ? या बददलचा विचार करायला हवा.त्यामुळे जगणे आणि जगण्यातील समस्येवर मात करण्यासाठी विचार करता येणे.त्या करीता वयानुरूप विचारप्रक्रिया होत राहाते.प्रत्यक्ष जगण्यातील अनुभव हेच खरे शिक्षण असते.आजच्या प्रसंगातून जबाबदार नागरिक निर्माण करण्यासाठीचे शहाणपण निर्माण करणे शक्य आहे ना.. ? त्यामुळे परीस्थितीचा उपयोग करून घेणे हे शिक्षण आहे याचा विचार करण्याची गरज आहे.निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट शिक्षणांची संधी मानून काम करीत गेलो तर खूप काही साध्य होईल.एकीकडे जगभरात लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नयेत.दिला तरी त्याचा वेळ कमीत कमी असावा असे म्हटले जात असतांना दुसरीकडे मात्र त्याचा वापर वाढविण्याचा प्रयत्न होतो आहे.मग मोबाईलपासून विद्यार्थी तुटणार कसे ? आपण एक गोष्ट नको असे सांगत असतांना ती कशी सहजतेने रूळवत नेतो हे लक्षातही येत नाही.शिक्षण आणि जीवन यामध्ये जीवन महत्वाचे आहे हे लक्षात घ्यायला हवे.जीवन असेल तर त्याचे मोल आणि समृध्दतेचा प्रवास शिक्षणांतून करता येईल. त्यामुळे वर्तमानात अंत्यत गंभीर परीस्थितीत शासनाने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करायला हवे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा