नागरिकांची कामे वेळेवर व्हावीत
नागरिकांची कामे वेळेवर व्हावीत यासाठी फायलींचा निपटारा वेळेत व्हावा ही मुख्यमंत्र्यांची सूचना वाचनात आली. मंत्रालयातील विविध खात्यांमधील जनतेची कामे वेळेवर मार्गी लागत नाहीत, कामाच्या फायली पडून राहतात त्यामुळे सामान्य माणसाला सोसावा लागणारा त्रास, ह्या टेबलावरून त्या टेबलाकडे खेळावा लागणारा खोखोचा खेळ, माराव्या लागणार्‍या फेर्‍या, होणारी रखडपट्टी, वेळ आणि वित्त यांचा होणारा अपव्यय यामुळे तो मेटाकुटीला येत होता. त्यामुळे गरजवंताला निराशा येत होती परंतु या सार्‍या पार्श्वभूमीवर नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रीमहोदयांना फायलींचा निपटारा लवकर करण्याच्या सूचना दिल्यात हे महत्त्वपूर्ण आहे. अभिनंदनीय आहे. कामाचा, प्रश्नांचा, समस्यांचा वेळेत निर्णय लागल्यास नागरिकांची यातायात कमी होईल. प्रकरणांचा वेळेत निपटारा व्हावा ही अपेक्षा सुद्धा या सरकारकडून करावीशी वाटते.
– विश्वनाथ पंडित, ठाणे
’संभाजी नगर’साठी आंदोलन उभारावे !

औरंगाबादचे नाव अधिकृतरीत्या संभाजीनगर असे करावे ही मागणी मागील 25 वर्षांपासून शिवसेना करत आहे. शिवसेनेने आपल्या मुखपत्रापासून त्याची सुरुवातही केली आहे. आज राज्यातील महाआघाडी सरकारमध्ये शिवसेना केंद्रस्थानी असली, तरी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची औरंगाबादचे नाव बदलण्याची मानसिकता नसल्यामुळे आता मनसेने विरोधी पक्ष म्हणून ही मागणी लावून धरली आहे. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे या मागणीकडे आजपर्यंत केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाहिले गेल्यामुळे या मागणीला आजपर्यंत तितकासा जोर चढला नाही. जोपर्यंत औरंगाबादचे नाव संभाजीनगर होत नाही तोपर्यंत व्यापक जनआंदोलन उभारले जायला हवे.
– जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
परकीय भाषेचेही ज्ञान हवे

आपण शिक्षणात (माध्यमिक शिक्षणात) 3 भाषा शिकतो. त्यात मराठी, संस्कृत वा हिंदी व इंग्रजी शिकविले जाते. बदलत्या जगात इंग्रजीला विशेष महत्त्व आले आहे, ते योग्य असो वा नसो. परकीय भाषांपैकी एक भाषा अवश्य शिकावी. त्यात फ्रेंच, जर्मन, उर्दू, रशियन व जपानी यांपैकी एक भाषा मुलांनी जरूर शिकावी. पुण्याला तशी केंद्रे आहेत; पण त्यासाठी पुण्याला राहणे, जाणे-येणे अवघड पडते. तालुक्यांच्या ठिकाणी कॉलेजे आहेत. त्यात आवर्जून अशी केंद्रे असायला हवीत.
– श्रीराम दाते, राजगुरुनगर.

अभिनयाचा समतोल
सध्या ’स्टार प्रवाह’वर ’आई कुठे काय करते’, ही मालिका चालू आहे. यातील सर्वच कलाकारांनी अभिनय चांगले केले आहेत परंतु विशेष अभिनय डोळ्यात भरतो तो, कुटुंबातील आई, बायको, गृहिणी अशी तिहेरी भूमिका सादर केलेल्या, मधुराणी गोखले (प्रभुलकर) यांचा. त्यांनी या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. कुटुंबातील प्रत्येकासाठी धडपडणे, त्यांना समजून घेणे, त्यांच्या चुकलेल्या गोष्टी त्यांना, योग्य रीतीने समजावून सांगणे. अनेक प्रसंगात त्यांची होणारी घुसमट, त्यांच्या मनाची घालमेल. कोणी त्यांच्यावर आवाज चढवून बोलले तरी त्याला उलटून न बोलणे, त्याच्यापुढे माघार घेणे. या सर्व गोष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा समतोल उत्तम साधला आहे पण प्रसंगी त्या कठोर देखील बनू शकतात. यावर विश्वासच बसत नाही. प्रसंगी अन्याय सहन करून, गप्प बसणारी ती गरीब, शांत आई कुठे? आणि वेळ पडल्यास, समोरच्या व्यक्तीवर रुद्रावतार धारण करून, आपले चण्डिकेचे रूप धारण करणारी हीच का ती आई? असा प्रश्न रसिकांच्या मनात येतो.
– गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (पू ), मुंबई

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा