पुणे : पीएमपीच्या संचलनातील तोटा हा दरवर्षी वाढतच चालला आहे. या आर्थिक वर्षांत पीएमपीला सुमारे ३५० कोटी रुपये संचलनातील तूट आली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तूट ४३ कोटी रुपयांनी अधिक आहे.

लेखा परीक्षण अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एकमेव पर्यााय असलेली पीएमपीची बससेवेतील संचलनातील तूट वाढत असून, यासंबंधित लेखा परीक्षण अहवाल मुख्य लेखा परीक्षक अंबरीश गालींदे यांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. या अहवालानुसार पीएमपीच्या संचलनातील तूट कमी होत नसून ती वाढतच चालली असल्याचे स्पष्ट होत आहे.

२०१७-१८ या आर्थिक वर्षात पीएमपीला संचलनात सुमारे ३०६ कोटी २९ लाख रुपये इतकी तूट आली होती. २०१८-१९ या आर्थिक वर्षात ही तूट ४३ कोटी रुपयांनी वाढून ३४९ कोटी ३६ लाख रुपयांपर्यंत पोचली आहे. ही तूट होण्यामागील कारणेही स्पष्ट केली गेली आहेत. यामध्ये तिकीट विक्री ही गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० कोटी २४ लाखांनी कमी झाली आहे. प्रत्येक बसचा प्रति किलोमीटर संचलनाचा खर्च हा ६ रुपये ९३ पैसे इतका झाला आहे. त्याचवेळी कोणतीही तिकीट दरवाढ किंवा पासच्या दरात वाढ केली गेली नाही. संचलनातील तूट कमी करण्यासाठी विविध उपाय केले गेले. यामध्ये तिकीट तपासणी पथकांची नियुक्ती जास्त प्रमाणात केली गेली. त्याचप्रमाणे संचलनातील प्रति किलोमीटरचा खर्च हा दीड रुपयांनी कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सात वर्षाहून अधिक जुन्या बसेस टप्प्या टप्प्याने सेवेतून बाहेर काढल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे जाहिरात धोरण राबवून उत्पन्न वाढविणे शक्य आहे. जास्तीत जास्त बसेस या मार्गावर धावण्यासाठी उपाय केले पाहिजेत. पीएमपीच्या मालकीच्या मिळकतींचा उपयोग हा जास्तीत महसूल मिळविण्याकरिता झाला पाहिजे, बाजारभावानुसार मिळकतीमधील गाळे भाडेतत्त्वावर द्यावेत, भाडेकरार संपलेल्या मिळकतींचे नवीन करार करावेत, मार्गांची पुनर्रचना करून तोट्यात असलेल्या मार्गावरील बसेस बंद करणे, देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च कमी करणे, हिशोब ठेवण्यासाठी ‘एक्रुल’ पद्धतीचा वापर करावा, असे उत्पन्न वाढीचे उपाय सुचविण्यात आले आहेत.

पीएमपीची बससंख्या, मार्गावर असणार्‍या बसेसची संख्या

आणि मार्गावर न गेलेल्या बसेसची संख्या वर्षनिहाय पुढीलप्रमाणे

2018-19 : 2058 : 1373 : 685
2017-18 : 2027 : 1425 : 602
2016-17 : 2045 : 1382 : 663
2015-16 : 2075 : 1447 : 629
2014-15 : 2087 : 1364 : 723.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा