सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय पक्षांना दणका

नवी दिल्ली, (पीटीआय) : कलंकितांना उमेदवारी देण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना मोठा दणका दिला आहे. उमेदवारांवरील प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील जाहीर करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी का देण्यात आली याची कारणे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. जिंकण्याची क्षमता हा गुन्हेगारांना उमेदवारी देण्याचा निकष असू शकत नाही, तर त्याची पात्रता, कामगिरी आणि गुणवत्ता महत्त्वपूर्ण असते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसंदर्भात वकील अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर न्यायमूर्ती आर.एफ. नरीमन आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या पीठासमोर 31 जानेवारी रोजी सुनावणी झाली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.

काल निकाल देताना न्यायालयाने राजकीय पक्षांना काही निर्देशही केले. सर्व राजकीय पक्षांनी उमेदवार घोषित करण्याच्या 72 तासांच्या आत निवडणूक आयोगाला त्या उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत अहवाल द्यावा लागेल, असे आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यानंतर त्या उमेदवाराबाबतची माहिती स्थानिक वर्तमानपत्रांमध्येही प्रसिद्ध करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली तर त्यामागील कारणही पक्षांना स्पष्ट करावे लागेल. तसेच उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची सर्व माहिती फेसबुक, ट्विटर हँडलवर टाकावी लागेल. तसेच, वर्तमानपत्रातदेखील प्रसिद्ध करावी लागणार आहे.

गेल्या चार सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकारणातील गुन्हेगारीकरणामध्ये चिंताजनक वाढ झाली असल्याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. राजकीय क्षेत्रातील कलंकितांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी काही महत्त्वाचे पावले उचलण्याची गरजही न्यायालयाने व्यक्त केली.

गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी संसदेने कायदा करावा, अशी सूचना न्यायालयाने यापूर्वी केली होती. त्याचबरोबर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर वृत्तपत्र आणि वृत्त वाहिन्यांवरून स्वतःवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करावी, असा आदेशही दिला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा