विविध संघटनांच्या विरोधानंतर रद्द

पुणे : पत्रकारितेचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विश्व संवाद केंद्रातर्फे ‘नोईंग आरएसएस’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कार्यशाळेस विद्यार्थ्यांना पाठवू नये, अशी मागणी विविध संघटनांनी केल्यानंतर ही कार्यशाळा रद्द करण्यात आली असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या (रानडे इन्स्टिट्यूट) विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, अशा सूचना विभागातर्फे गुरुवारी देण्यात आल्या होत्या. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता आरएसएसचे धडे दिले जाणार आहेत का? असा सवाल विविध संघटनांनी उपस्थित केला होता. कार्यशाळेला होणारा विरोध लक्षात घेता विद्यापीठाने माघार घेतली आहे. रानडे इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्यासाठीचे वेळापत्रक तयार केले जाते. या वेळापत्रकात शनिवार पेठ येथील ‘मोतीबाग’ या आरएसएसच्या कार्यालयात दि. 15 फेब्रुवारी रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बीएमसीसीचे माजी प्राचार्य व आरएसएसचे ऑल इंडिया संपर्क प्रमुख प्रा. अनिरूध्द देशमुख या कार्यशाळेत पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती रानडेच्या विद्यार्थ्यांना विभागातर्फे देण्यात आली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा