पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी अजून किती दिवस लागतील ते सांगता येत नाही. रावेत आणि निगडीतील पाणी उपसा केंद्रांची क्षमता वाढविली जात नाही तो पर्यंत हे असेच चालणार आहे. अशा शब्दात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठाच चालू राहण्याचे स्पष्ट संकेत दिले.

हर्डीकर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पवना धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. तरीही शहरात दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. धरणात प्रतिदिन केवळ 420 एमएलडी पाणी उपसा करण्याची परवानगी आहे.
त्यापुढील पाण्यासाठी महापालिका दंड भरते. धरणात जादा पाणी उपलब्ध असल्यावर दंड भरुन महापालिकेला जादा पाणी दिले जाते. पवना नदीतून रावेत बंधारा येथील पालिकेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रातून पाणी उचलले जाते. रावेत पंपगृहातील 19 पंप 24 तास चालू आहेत. त्यासाठी पंपिंगची क्षमता वाढविण्यात येणार आहे.

जुने पंप काढून मोठ्या क्षमतेचे नवीन 16 पंप टाकले जाणार आहेत. त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. तसेच सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात सध्या 500 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जावू शकते. या क्षमतेत देखील 580 एमएलडीपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. वीजेचा भार देखील वाढवून घेतला जाणार आहे. 100 एमएलडी अधिकचे पाणी निर्माण करण्याची क्षमता करत आहोत. त्यानंतरच दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

पुणे महापालिकेचे आंद्रा भामा आसखेड प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. त्यांचे काम पुर्ण झाल्यावर वाघोली ग्रामीण पाणी पुरवठा योजना मंजुर कोट्यासह पिंपरी महापालिकेस हस्तांतरीत केल्यानंतर शहराचा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक असलेले 30 एमएलडी पाणी उपलब्ध होईल. त्यानंतर सुद्धा दररोज पाणीपुरवठा करता येऊ शकेल.

तसेच देहू बंधार्‍यातून 100 एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन पाणीपुरवठा करता येईल. याबाबत देहुतील ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा झाली आहे. महापालिका देहूला होणार्‍या पाणीपुरवठ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा