संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै

देव मानतो किंवा देव मानत नाही यापेक्षा आमचे म्हणणे वेगळेच आहे. देव आहे किंवा नाही हा चर्चेचा विषयच नाही, हा वादाचा विषयच नाही. ज्या गोष्टी आपल्या अनुभवाला येतात त्या नाही कशा म्हणायच्या? ज्या गोष्टी कुणालाही अनुभवता येतील पण अनुभव घ्यायचाच नसेल तर त्याला कोण काय करणार? पुष्कळशी माणसे दुसर्‍याचे काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. एखादया माणसाकडून काही चूक झाली तर तो स्वतःची बाजू मांडतो. मी काही अपराध केलेला नाही, माझी काही चूक झालेली नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला असेल पण समोरच्याचे डोके फिरलेले असते तो काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. अशावेळी त्याच्यापुढे काय डोके फोडणार? देव आहे की नाही हा मानण्याचा विषय नाही, तो कल्पनेचा विषय नाही तर तो अनुभवण्याचा विषय आहे. अनुभवाचिये जोगे नोहे बोला ऐसे. हवा अनुभवण्याचा विषय आहे. हवा दाखव म्हटले तर कसे दाखवणार? हवा चाखायची आहे म्हटली तर कशी चाखणार? हवा ऐकायची आहे म्हटले तर कशी ऐकणार? तसे देवाच्या बाबतीत आहे. हवा आहे की नाही हे नाक व तोंड दाब मग तुला कळेल. वस्तुस्थिती ही नाकारावी किंवा स्विकारावी, माणसाने पाहिजे ते करावे पण वस्तुस्थिती ही तशीच असते. मृगजळाच्या ठिकाणी पाणी नसते पण हरणाला ते पाणी आहे असे वाटत असते तसे या जगांत परमेश्वर दिसत नाही म्हणून तो नाही असे म्हणता येणार नाही. ज्याच्याजवळ बुध्दी आहे, जो बुध्दीला चालना देतो, ज्याच्याजवळ विचार करण्याची शक्ती आहे तो तसा विचार करणार नाही. त्याला परमेश्वराचे रूप व स्वरूप आकळण्याची शक्ती येते. कळे ना कळे त्या धर्म ऐका सांगतो रे वर्म माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा तोच वाट दाखवतो. जरी सद्गुरू केला नाही तरी तो आपणहून वाट दाखवतो पण ते कधी? त्यासाठी तुमची तितकी तयारी पाहिजे. स्वतःहून अभ्यास करणारी मुले असतात पण आज जो उठतो तो क्लासला जातो. क्लासला न जाता मी अभ्यास करेन व पहिला नंबर काढेन असे म्हणणारे व काढणारे लोकही आहेत. तसे काही लोक आहेत की त्यांना सद्गुरूंशिवाय साक्षात्कार झाला पण त्यांची तपश्चर्या मोठी होती. उदाहरणार्थ तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांची तपश्चर्या किती होती? रात्रंदिवस त्यांनी नामस्मरण केलेले आहे. करावा नामघोष रात्रंदिन. इतके नामस्मरण केले की नामस्मरण बंद पडू नये, नामस्मरण करता करता झोप येवू नये म्हणून ते आपली शेंडी झाडाला बांधून ठेवत असत. झोप आली की मानेला हिसका बसे. आता लोकांना शेंडीच नसते. आता तर नामाचीही गोडी नसते.
(सौजन्य ?: जीवन विद्या मिशन)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा