सवंग लोकप्रियतेचे निर्णय
पाणी मोफत, काही युनिटपर्यंत वीज मोफत, महिलांना बसप्रवास मोफत इ. सवंग लोकप्रियतेच्या योजना (जे सर्व जनतेच्याच पैशांतून केले जाते) काही महिने अगोदर राबवत अखेर आप सरकार बहुसंख्येने राज्यावर आले ! त्यात मतांच्या टक्केवारीचे विश्लेषण जे आले आहे, त्यात सरासरी भाजप व आप उमदेवारांतील मतात फार थोडाच फरक आहे. म्हणजे भाजपची मतांची टक्केवारी बरीच वधारलेली दिसते ! दिल्लीत खरे तर भारतभरचे नागरिक राहतात आणि त्यात असे सवंग परिणाम दूरगामी हिताच्या दृष्टीने योग्य नाहीत ! महाराष्ट्रातही कोरा सातबारा, कर्जमाफी, शिवभोजन असल्या योजना जाहीर झाल्याच आहेत. दिल्लीच्या निकालानंतर लगेच विरोधकांनी ‘बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना’ वृत्तीच्या पिपाण्या वाजवणे व ताशेरे झोडणे सुरू केले. वास्तविक सवंग लोकप्रियतेच्या सर्व योजना नाकारत सर्व राज्यांतील जनतेने फुकटेगिरीला वेळीच आळा घातला नाही, तर हे दुखणे पुढे देशाच्या मुळावर येऊ शकते, याचे भान ठेवणे जरूर आहे. विरोधक त्यांची दुकाने बंद होतील, या भयाने इतका टोकाचा मोदीद्वेष करत आहेत व आकांडतांडव करत आहेत, की मोदी शासनाने घेतलेले कठोर निर्णय दीर्घकालीन परिणाम करणारे; परंतु देशहिताचे आहेत, हे आता जनतेने समजून घेतले पाहिजे.
– श्यामसुंदर गंधे, पुणे.

अत्याचार कधी थांबणार?
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला भर रस्त्यात पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न विकृत मनोवृत्तीच्या तरुणाने केला. सदरची घटना अत्यंत घृणास्पद व काळीज पिळवटून टाकणारी आहे. आपल्या देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, ही शरमेची बाब आहे. ‘स्त्री’ ही केवळ उपभोगाची वस्तू आहे ही मानसिकता भारतीय समाज व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात रुजली आहे. त्यामुळेच अशा घटना वाढत आहेत. आमच्या माता-भगिनींना आजच्या जमान्यात असुरक्षिततेच्या भीतियुक्त वातावरणात जगावे लागत आहे. महिलांवरील अत्याचार कधी थांबणार ? भारतीय समाजव्यवस्था इतक्या नीच थराला का गेली, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
– दादासाहेब वसगडेकर, कर्‍हाड.

‘मनसे’ बळकट करा
राज यांच्या प्रचंड सभा; पण मतदान करताना मात्र हात, घड्याळाला मतदान. खरेतर राज ठाकरे यांचे कौशल्य पक्षाची संघटना मजबूत करण्यात कमी पडले. सभासद नोंदणी नाही. जनसंपर्क नाही. फक्त अधूनमधून सभा. त्यासुद्धा भाजप व इतर पक्षांवर टीका. पक्ष मजबूत होण्याकरिता केजरीवालांसारखे काम करावे लागते. एक साधा, अण्णा हजारेंच्या आंदोलनातील कार्यकर्ता तीन वेळा मुख्यमंत्री होतो, हे त्यांची जनतेशी जोडलेली नाळ. राज ठाकरे यांनी असेच स्वतंत्र बाण्याने, महाराष्ट्र नवनिर्माणच्या प्रत्येक जिल्ह्यात शाखा काढणे, सभासद संख्या वाढविणे. जनतेत मिसळून त्यांच्या व्यथा समजून त्यांचा निपटारा करणे… आदी कामे केली, तर राज ठाकरे ‘राज्य’मान्य होतील. भाजपसारख्या फक्त स्वतःच्या पक्षाचा आश्रय घेण्यापेक्षा नवा झेंडा व जनतेची साथ केली, तर गर्दीप्रमाणे मते मिळतील. केजरीवालांच्या चालीने, चला यश तुमचेच.’
शशिकांत दिघे, पुणे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा