पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिरेकी असल्याचे वक्तव्य मी केलेच नव्हते,असे सांगत केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या विधानावरून माघार घेतली. असे म्हणतानाच दिल्लीत काँग्रेस लुप्त झाले आहे. परंतु, काँग्रेसच्या लोकांनी मते फोडली की, आम आदमी पक्षाला वळवली? असा प्रश्न उपस्थित करत एकाच दगडात दोन पक्षी मारले. पुण्यात आयोजित कार्यक्रमानंतर जावडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जावडेकर म्हणाले,”दिल्लीतून काँग्रेस लोकांनी लुप्त केली की त्यांनी मते ‘ट्रार्न्फर’ केली, हा वेगळा विषय आहे. लोकसभेत काँग्रेसला २६ टक्के मते मिळाली होती. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ चार टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे भाजप आणि आप यांच्यामध्येच सरळ लढत झाली. भाजपला ४२ टक्के आणि ‘आप’ पक्षाला ४८ टक्के मिळतील, असा आमचा अंदाज होता. मात्र, तीन टक्क्यांनी अंदाज चुकला. भाजपला ३९ टक्के, तर ‘आप’ला ५१ टक्के मते मिळाली. निवडणुकीत यश अपयश येत असते. भाजपकडून या निकालाचे विश्लेषण करण्यात येत आहे.

दिल्लीतील निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारामध्ये केजरीवाल हे अतिरेकी असून त्यांच्याविरुद्ध पुरावे आहेत,असे विधान जावडेकर यांनी केले होते. परंतु, जावडेकर यांनी सारवासारव करत मी असे बोललोच नाही, असे म्हणत आपल्या विधानावरून माघार घेतली.

सत्य बाहेर येईल म्हणून उद्विग्नता

कोरेगाव भीमा येथील हिंसाचार आणि पुण्यात भरविलेल्या एल्गार परिषदेबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) तपास दिला आहे. या संदर्भात माजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार प्रसार माध्यमात चुकीचे विधाने करून वेगळे वळण देण्याचा प्रकार करत आहे. परंतु, या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्याचा आदेश काढला असून लवकर ’सत्य बाहेर येईल’ म्हणून त्यांची उद्विग्नता समजू शकतो,असा टोला जावडेकर यांनी लगावला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा