इंदूर (पीटीआय) : चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते डिसेंबर २०१९ दरम्यान देशातील सार्वजनिक क्षेत्रातील १८ बँकांमध्ये आर्थिक गैरव्यवहारांची ८,९२६ प्रकरणे घडून आली आणि त्या योगे बँकांची १.१७ लाख कोटी रुपयांची रक्कम गेली.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेला या गैरव्यवहारांचा सर्वाधिक फटका बसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले. ही माहिती चंद्रशेखर गौर या माहिती-अधिकार कार्यकर्ते यांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडून अधिकृतपणे मिळविली.

स्टेट बँकेत या नऊ महिन्यांत ४,७६९ आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे नोंदविली असून, त्यातून ३०,३०० कोटी रुपयांचा फटका सोसला आहे. म्हणजेच गैरव्यवहारांत लयाला गेलेल्या एकूण १.१७ लाख कोटींपैकी २६ टक्के नुकसानीचा भार एकटय़ा स्टेट बँकेने सोसला आहे.

त्या खालोखाल नीरव मोदी, चोक्सी या हिरे व्यापाऱ्यांनी गंडा घातलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे ताज्या २९४ प्रकरणात १४,९२८.६२ कोटी रुपये अडकले असल्याचे या माहिती अहवालातून दिसते. तर या कालावधीत बँक ऑफ बडोदाचे २५० प्रकरणात ११,१६६.१९ कोटी रुपये गेले.

अलाहाबाद बँकेत गैरव्यवहार प्रकरणांची संख्या ८६० इतकी मोठी असली तर त्या संबंधित रक्कम मात्र ६.७८१.५७ कोटी रुपये इतकी आहे. तर बँक ऑफ इंडियात ६,६२६.१२ कोटी रुपयांची १६१ गैरव्यवहारांची प्रकरणे नऊ महिन्यात घडली.

युनियन बँक ऑफ इंडियाचे २९२ प्रकरणात ५,६०४.५५ कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बँकेचे १५१ प्रकरणात ५,५५६.६४ कोटी रुपये, तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे २८२ प्रकरणात ४,८९९.२७ कोटी रुपयांना गंडा घातल्याचे ही माहितीतून समोर आले.

कॅनरा बँक, युको बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक या अन्य १० बँकांमध्ये मिळून १,८६७ गैरव्यवहारांची प्रकरणे या नऊ महिन्यांत नोंदविली गेली आणि त्यातून या बँकांना ३१,६००.७६ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या माहिती आर्थिक गैरव्यवहारांचे नेमके स्वरूप स्पष्ट नाही. शिवाय त्याच्याशी संबंधित नोंदविली गेलेली रक्कम ही बँकांना झालेले नुकसान आहे काय, हेही स्पष्ट नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा