तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) : घोरावाडी रेल्वे स्टेशनमध्ये रात्री 9 वाजल्यानंतर तिकीट हाउसमधून पुणे लोणावळा प्रवास करणार्‍या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची तिकीट देणे बंद केल्याने प्रवाशांना नाहक दंड भरावा लागत असून, मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने प्रवाश्यात नाराजी निर्माण होत आहे.

तळेगाव दाभाडे गावात राहणारे नागरिक पुण्याला तसेच लोणावळापर्यंत रेल्वेने प्रवास करण्यासाठी घोरावाडी रेल्वे स्थानकावरून रेल्वे प्रवास करत असतात. या रेल्वे स्टेशन वरून रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात.सध्या रेल्वे खात्याने रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत घोरावाडी रेल्वे स्टेशन येथून प्रवास करणार्‍या प्रवाशांना प्रवासाचे तिकीट देणे बंद केले आहे.

रात्री 9 नंतर पहाटे 5 वाजेपर्यंत पुण्यावरून – लोणावळ्याकडे जाणार्‍या व लोणावळ्या वरून पुण्याकडे जाणार्‍या सर्व घोरावाडी रेल्वे स्टेशनवर थांबा असलेल्या गाड्यांना या रेल्वे स्थानकामधून तिकीट गृह बंद असल्याने तिकीट मिळत नाही. त्यामुळे सदर वेळेमध्ये येणार्‍या प्रवाश्यांना विनातिकीट रेल्वे प्रवास करावा लागतो.जर तिकीट तपासणी करणारांनी पकडले तर नाहक दंड द्यावा लागतो.

या प्रवासासाठी तळेगाव रेल्वे स्टेशन येथे तिकीट मिळते. पण ते काढण्यास जाण्यास प्रवाशाला शक्य नसते. घोरावाडी रेल्वे स्टेशनमध्ये एटीव्हीएमचे मशीन बसवले आहे. परंतु याठिकाणी या मशीन्सची पूर्ण माहिती नसल्याने व परिसरातील अशिक्षित प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रेल्वे स्टेशनमध्ये रात्रीची तिकीट देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा