आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, (प्रतिनिधी) : उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात येणारे ‘सिम्पल’ अ‍ॅप आता दुसर्‍या टप्प्यामध्ये नऊ जिल्ह्यात वापरण्यात येणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आता मधुमेह रुग्णांची देखील नोंद ठेवण्यात येणार असून त्यासंदर्भातला पथदर्शी प्रकल्प वर्धा जिल्ह्यात सुरु आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली.

राज्यात सध्या भंडारा, वर्धा, सिंधुदुर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या अ‍ॅपच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी केली जात आहे. बदलत्या जीवनशैलीशी निगडित उच्च रक्तदाबाच्या आजारावर नियंत्रणासाठी ‘इंडिया हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह’ (आयएचसीआय) यांच्या मदतीने हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपमध्ये नोंदणी केलेल्या रुग्णांची रक्तदाबाची तपासणी उपचार मोफत केले जात आहे. त्याचबरोबर त्यांना महिनाभराच्या गोळ्यादेखील मोफत दिल्या जातात. आतापर्यंत भंडारा, वर्धा, सिंधुदुर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांमध्ये 1 लाख 27 हजार रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. दुसर्‍या टप्प्यात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, पुणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर, कोल्हापूर आणि सांगली या नऊ जिल्ह्यांमध्ये ‘सिम्पल’ पचा वापर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केला जाणार आहे. उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेहाच्या रुग्णांची नोंदणीदेखील या पवर करण्यात येणार असून त्यासंदर्भातील प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प वर्धा जिल्ह्यात सुरु झाला आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा