अंदाजपत्रकीय अधिवेशनात कायदा करणार

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी पर्यंतच्या इयत्तांना मराठी भाषा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबतचे विधेयक येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाणार आहे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून हे विधेयक मंजूर करण्यात येईल अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दक्षिणेतील राज्यांमध्ये तामिळ,कानडी आदी स्थानिक भाषा शिकविणे सक्तीचे आहे.त्यासाठी कायदे करण्यात आले आहेत.याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी सक्तीचा कायदा करण्यात येत असल्याचे सांगून सुभाष देसाई म्हणाले,राज्यातील मराठी विषय नाही अशा सुमारे 25 हजार शाळा आहेत त्यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात येणार आहे. सीबीएसई, किंवा आयसीएसईसह सर्व अभ्यासक्रमाच्या शाळांसाठी हा निर्णय लागू असणार आहे. हा कायदाच करण्यात येणार असल्याने तो सर्व शाळांना बंधनकारक असणार आहे.सगळयांनी त्याचे पालन करून सहकार्य करावे अशीच सरकारची अपेक्षा आहे.उल्लंघन करणा-यांवर मसुदयात कारवाईची तरतूद केली जाणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.केंद्रिय अधिका-यांच्या इतर राज्यांत बदल्या होत असतात अशांच्या मुलांबाबत काही वेगळा विचार करता येऊ शकतो का हे देखील तपासण्यात येईल असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

वाहनांवरील मराठी नंबरप्लेट वैध
वाहनांवर मराठी नंबरप्लेट असल्यास याआधी कारवाई होत होती.मात्र आता तशी कारवाई करण्यात येणार नाही.वाहनांवरील मराठी नंबरप्लेट या वैध असतील अशी माहितीही सुभाष देसाई यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयासाठी पाठपुरावा
बाँबे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय असे नामकरणाचा विषय केंद्र सरकार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारितील विषय आहे.राज्य सरकार त्यासाठी पाठपुरावा करत असल्याचेही सुभाष देसाई म्हणाले.

मराठीचा अडीच हजार वर्षांचा प्रवास उलगडणार
27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणार्‍या 4 विशेष पुरस्कार आणि साहित्यिक योगदानाबद्दल उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती करिता 35 वाड्;मय पुरस्कारांचे वितरण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहेत. यानिमित्ताने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात जे पुरावे तज्ज्ञांनी केंद्राकडे सादर केलेल आहेत. अशा मराठी भाषेच्या अडीच हजार वर्षांचा पुरावे मनोरंजन कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वसामान्यांसमोर उलगणार असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा