न्यायालयाचा आदेश

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारागृहात असणारे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या चार आलिशान मोटारी तूर्तास लिलावातून वगळण्यात याव्यात, असा आदेश बुधवारी न्यायालयाने दिला आहे. शनिवारी (ता.१५) वाहनांचा लिलाव होणार आहे.

लिलावातून वगळण्यात आलेल्या वाहनांमध्ये दोन बीएमडब्ल्यू, एक पोर्शे आणि टोयोटा मोटारीचा समावेश आहे. या वाहनांच्या नोंदणीबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. लिलाव करण्यात येत असलेली तेरापैकी आठ वाहने ही डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्यामुळे ती विकण्यात येऊ नये असा, अर्ज बचाव पक्षाकडून विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात केला होता. त्यावर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने चार वाहने लिलावातून वगळली आहेत. डीएसके व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या 20 वाहनांपैकी 13 वाहनांचा लिलाव करण्याची करण्याची परवानगी यापूर्वी न्यायालयाने दिली आहे. या वाहनांची किंमत दोन कोटी 57 लाख 50 हजार रुपये आहे. डीएसकेंकडे बीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयाटो कॅमरी, एमव्ही ऑगस्टा यांसारख्या कोट्यवधी रुपयांच्या आलिशान गाड्या होत्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा