मुंबई, (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा पक्षाच्या झेंड्यात वापर केल्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाने मनसेला नोटीस बजावली आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा व अजेंडा बदलला आहे. मनसेच्या आधीच्या झेंड्यात पूर्णपणे बदल करून शिवमुद्रा मध्यभागी असलेला भगवा झेंडा मनसेने घेतला आहे. मनसेच्या महाअधिवेशनात या नवीन झेंड्याची घोषणा झाली. त्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी अवैध पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात काढलेल्या महामोर्चामध्ये हाच नवीन झेंडा फडकवला होता. मात्र, या झेंड्यामध्ये शिवमुद्रा वापरल्याने त्याला आक्षेप घेण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेड, जय हो फाउंडेशन आणि अखिल भारतीय मराठा महासंघ या संघटनांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मनसे हा राजकीय पक्ष असून राजकीय पक्षाने थोर व्यक्ती व चिन्हांचा गैरवापर केला असल्याच्या आशयाची ही तक्रार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या तक्रारींची दखल घेऊन या संदर्भातील नोटीस मनसेला बजावली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा