बीजिंग : चीनमधील कोरोना विषाणूने आजूबाजूच्या देशांचीही झोप उडवली आहे. त्याचा परिणाम जगावर होताना दिसतो. जगातील इतर देशांच्या बाजारपेठांवर, व्यवसायावर परिणाम होत आहे. भारतावरही कोरोनाचा परिणाम होत असून औषध टंचाई निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे.

भारतात सध्या फक्त एप्रिल महिन्यापर्यंतच औषधांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळते. चीनमधील वुहान प्रांतात औषधांशी संबंधित बऱ्याच कंपन्या आहेत. या प्रांतातच कोरोनाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. त्यामुळे वुहानमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. वुहानमधील कंपन्यांमधून कच्चा मालाच्या रुपात औषधे तयार केली जातात आणि जगभरातील विविध ठिकाणी पाठवली जातात.

भारतातही औषधांसाठीचा कच्चा माल हा चीनमधून आयात होतो. त्याचे जवळपास ८० टक्के प्रमाण आहे. चीनमधून भारतात जवळपास ५७ प्रकारचे मॉल्युक्यूल्स आयात होतात. फक्त औषधेच नव्हे तर शस्त्रक्रियांसाठी लागणारे ९० टक्के उपकरणे, साहित्य देखील चीनमधून आयात केली जातात. कोरोनामुळे चीनमधील विशेषत: वुहानमधील औषध कंपन्यांचे व्यवहार ठप्प झाले. त्याचा परिणाम थेट भारतातील औषध साठ्यावर होत आहे.

भारतात औषधांच्या किंमतीत वाढ होऊ नये यासाठी केंद्र सरकारने एक समिती उभी केली आहे. येत्या एक महिन्यात चीनमधून औषधांसाठी आवश्यक असणारा कच्चा माल न आल्यास देशात गंभीर वैद्यकीय परिस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा