नवी दिल्ली, (पीटीआय) : दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आरूढ होणार आहेत. येत्या रविवारी, 16 फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची तिसर्‍यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात किती जणांचा समावेश असेल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

केजरीवाल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत केजरीवाल यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली. आपचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. आपचे दुसर्‍या क्रमांकाचे नेते, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केजरीवाल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यास सर्वानुमते मंजुरी मिळाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सिसोदिया यांनी शपथविधी सोहळ्याची माहिती दिली. या सोहळ्यास सर्व दिल्लीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. तत्पूर्वी, केजरीवाल यांनी उपराज्यपाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर शपथविधी सोहळ्याच्या तारखेवर शिक्कामोर्तब झाले.

याआधी, 14 फेब्रुवारी रोजी केजरीवाल शपथ घेतील, अशी चर्चा होती. केजरीवाल यांनी पहिल्या कार्यकाळात 14 फेब्रुवारी 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जाताना 14 फेब्रुवारी 2015 रोजी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सत्तास्थापन केल्याच्या तीन वर्षांनंतर म्हणजेच 2018 मध्ये केजरीवाल यांनी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रमदेखील 14 फेब्रवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे याही वेळेस ते 14 फेब्रुवारी रोजी शपथ घेतील, असे सांगितले जात होते.

आम आदमी पक्षाने दिल्लीत सलग तिसर्‍यांदा विजय मिळविला आहे. विधानसभेच्या तब्बल 62 जागा आपने मिळविल्या आहेत. मागच्या तुलनेत पाच जागा घटल्या असल्या, तरी केजरीवाल यांचे सरकार बहुमताचे असणार आहे. भाजपची मजल तीन जागांवरून 8 जागांवर पोहोचली आहे.

मंत्रिमंडळाबाबत उत्सुकता

अरविंद केजरीवाल यांचे नवे कॅबिनेट कसे असेल? यात कोणा-कोणाचा समावेश असेल? महत्त्वाची खाती कायम राहतील की बदलली जातील? याबाबत आता उत्सुकता असणार आहे. मंत्रिमंडळात फारसा बदल केला जाणार नाही, असे काही जाणकारांचे मत आहे. मात्र, काही नवे चेहरे निश्चितच दिसतील, अशी शक्यतादेखील वर्तविली जात आहे. उपमुख्यंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचा मंत्रिमंडळात प्रवेश निश्चित मानला जात आहेत. काहींना डच्चू मिळण्याचीही शक्यता आहे. राजेंद्र नगरमधून विजयी झालेले राघव चढ्ढा आणि कालकाजी येथून निवडून आलेल्या आतिशी यांची वर्णी लागू शकते. हे दोघेही आपचे महत्त्वाचे नेते आहेत. दिलीप पांड्ये यांचेदेखील नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा