पर्यटकांचा कल युरोपकडे!

संजय ऐलवाड

पुणे : बाजारपेठ आणि उद्योग क्षेत्रासाठी चीन जगप्रसिद्ध आहे. जगभरातून चीनला ये-जा करणार्‍या व्यापारी, उद्योजकांसह पर्यटकांची संख्यादेखील प्रचंड मोठी आहे. मात्र, चीनमध्ये फैलावलेल्या कोरोना विषाणूमुळे भारतातून एअर इंडियासह खासगी कंपन्यांनी चीनच्या विमान फेर्‍या रद्द केल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी आपला मोर्चा युरोपकडे वळविला आहे. कोरोनामुळे चीनमधील अंतर्गत रस्तेही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. उद्योगजगताला त्याचा मोठा फटका बसत आहे.

मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या शहरातून चीनसाठी दिवसभरात विमानाच्या 10 फेर्‍या होतात. विशेषत: गाँझोओ या शहरात मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग जातो. हे शहर खेळणी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारपेठेसाठी ओळखले जाते. व्यापारी आणि उद्योजकांबरोबरच पर्यटक बीजिंगसह चीनची आकर्षक भिंत पाहण्यासाठी जातात. कोरोनामुळे आठवडाभरापूर्वीच चीनमध्ये राष्ट्रीय आपत्तीची घोषणा करण्यात आल्याने विमान कंपन्यांनी फेर्‍या रद्द केल्या आहेत, तर पर्यटन कंपन्यांनी चीनचे दौरे थांबविले आहेत.

पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता अशा महत्त्वाच्या शहरातून वर्षभरात सुमारे एक ते दीड लाख पर्यटक चीनला जात असतात. यासाठी चीनला जाणार्‍यांची संख्या 4 ते 5 लाख इतकी आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस चीनच्या सर्वच भागात वाढत चालला आहे. त्यामुळे बहुतांश शहरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. काही शहरात तर घराबाहेर पडण्यासही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भारतासह जगभरातून चीनमध्ये येणारी विमाने रद्द झाली आहेत. पर्यटनही पूर्णत: बंद आहे.

थायलंड, मलेशिया, सिंगापूरच्या पर्यटकांत घट
थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहेत. भारतासह इतर देशातून येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर वाढत असल्याने थायलंड, मलेशिया, सिंगापूरलाही पर्यटकांचा फटका बसत आहे. मागील आठवडाभरात येथील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. तर, युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला पर्यटकांची सध्या सर्वाधिक पसंती आहे. कोरोना फैलाव न थांबल्यास थायलंड, मलेशिया आणि सिगापूरच्या पर्यटकांत आणखी घट होणार असल्याचा अंदाज ऑफ बीट डेस्टीनेशनचे संचालक नितीन शास्त्री यांनी व्यक्त केला.

वर्षभरात बाहेर पडलेले पर्यटक
देश पर्यटक
चीन 1 लाख
थायलंड 20 लाख
मलेशिया 15 लाख
सिंगापूर 20 लाख
ऑस्ट्रेलिया 10 ते 15 लाख
युरोप 8 ते 10 लाख
अमेरिका 10 ते 12 लाख

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा