इस्तंबूल – तुर्कस्तान येथील इस्तंबूल विमानतळावर भीषण दुर्घटना झाली आहे. धावपट्टीवर विमान घसरल्याने झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 179 जण जखमी आहेत. दुर्घटना इतकी भीषण होती की, अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तीन तुकडे झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, यावेळी तिघांचा मृत्यू झाला.

बोईंग 737 हे प्रवासी विमान लँडिंग करत असताना धावपट्टीवर घसरलं. हे विमान पेगासस एअरलाइन्सचं आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ता नुसार, विमानात एकूण 183 प्रवासी होते. विमानाचं लँडिंग करण्यात येत होतं तेव्हा तुफान पाऊस सुरु होता. तसंच वार्‍याचा जोरही वाढला होता. विमानाचा अपघात झाल्यानंतर त्याचे तीन तुकडे झाले. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दाखवलेल्या दृश्यांमध्ये अपघातानंतर प्रवासी अपघातग्रस्त विमानातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत असल्याचं दिसत आहे.

परिवहन मंत्र्यांनी सांगितल्यानुसार, लँडिंगनंतर एक मोठा स्फोट झाला, ज्यामुळे विमानाचे तीन तुक़डे झाले. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

दुर्घटनेनंतर विमानतळ बंद करण्यात आलं असून इतर विमानांचा मार्ग बदलण्यात आला आहे. विमानात तुर्कस्तानमधील प्रवाशांची संख्या जास्त होती. यामध्ये एकूण 20 परदेशी नागरिक होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा