पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने ‘लोकमान्य टिळक – आधुनिक भारताचे शिल्पकार’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.ही परिषद बुधवार दि.२२ जानेवारी ते शुक्रवार दि.२४ जानेवारी २०२० या कालावधीत विद्यापीठाच्या गुलटेकडी येथील संकुलातील जयंतराव टिळक सभागृहात होईल.परिषदेत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील बरेच शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासक सहभागी होत आहेत.

ही माहिती कुलगुरु डॉ. दीपक टिळक आणि परिषदेच्या निमंत्रक डॉ. गीताली टिळक यांनी दिली. यंदाचे वर्ष भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे.हे औचित्य साधून ही आंतरराष्ट्रीय परिषद होत असल्याचे डॉ. दीपक टिळक यांनी नमूद केले. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या लोकमान्यांच्या चतुःसूत्रीसह राष्ट्रीयत्व तसेच गीतारहस्य हा त्यांचा जगविख्यात ग्रंथ अशा सहा संकल्पनांवर ही परिषद केंद्रित राहील. लोकमान्यांची चतुःसूत्री आधुनिक भारताचा पाया रचणारी ठरली त्यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाने मांडलेली चतुःसूत्री, ‘गीतारहस्या’तून त्यांनी दिलेला कर्मयोगाचा संदेश आणि राष्ट्रीयत्वासह देशाच्या प्रश्नांवर त्यांनी केलेले विचारमंथन आजही तितकेच उपयुक्त आहेत. टिळक विचारांचे विविध पैलू यानिमित्त उलगडले जाणार आहेत,असे डॉ. टिळक म्हणाले.

उद्घाटन सोहळ्यात मलेशियातील लीनकॉल्न विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरु डॉ. अमिया भौमिक, इनफ्लिबनेटचे संचालक प्रा. जे. पी. सिंग जुरेल, नेपाळच्या त्रिभुवन विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ. सुरेंद्र केसी यांची उपस्थिती आहे.नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर अभ्यंकर, सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, आयुषचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी, इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. राजा दीक्षित, प्रा. वैजयंती नरवणे, जपानच्या ओझाकी हिरोको, चिदा सतोमी, तसेच इसोगाई टोमिओ, केंद्रीय जलसंशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. व्ही. व्ही. भोसेकर यांसह विविध संशोधक, वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेसाठी २०० शोधनिबंध आले आहेत. विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांसह पाचशेहून अधिक व्यक्ती या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत.

लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित एक नाटिका टिमवि आर्ट सर्कलने बसविली असून ती या परिषदेत सादर केली जाणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त टिमविच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या परिषदेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी अधिक माहितीसाठी डॉ. सी. सुनंदा यादव (020-24403098), अंजली मांडके (8457875205, 020-24403000/3098) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा