नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी होणार नाही. कारण, या प्रकरणातील चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश याने कनिष्ठ न्यायालयाकडून सुनावलेल्या मृत्यू दंडाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले, ज्यावर आज न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आरोपीच्या वकिलाने न्यायालयात युक्तीवाद केला आहे की, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर देखील त्याला १४ दिवसांचा वेळ मिळतो, यामुळे डेथ वॉरंट रद्द करावे.

दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी दिल्ली सरकारकडून सांगण्यात आले की, २२ जानेवारी रोजी फाशी देता येणार नाही. कारण, दयेचा अर्ज दाखल केला आहे. तुरूंग प्रशासनाच्या नियमांनुसार डेथ वॉरंटसाठी आरोपीच्या दयेच्या अर्जावर निर्णय येण्याची वाट पाहावी लागते. सरकार या संदर्भात २१ जानेवारी रोजी कनिष्ठ न्यायालयात बाजू मांडणार आहे. जर दयेचा अर्ज फेटाळाला जात असेल तर देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १४ दिवसांचा कालावधी नव्या डेथ वॉरंटसाठी द्यावा लागेल.

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींचा पुर्नविचार अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. विनय शर्मा आणि मुकेश या दोघांनी हा अर्ज दाखल केला होता. न्या. आर भानुमती आणि अशोक भूषण यांच्या ५ न्यायाधीशांच्या पिठाने हा अर्ज फेटाळला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा