नवी दिल्ली : जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या ’आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नाही. तसेच लेखक जयभगवान गोयल यांनी पुस्तक मागे घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी रात्री उशीरा दिली.

हे पुस्तक गोयल यांचे वैयक्तीक लिखाण आहे; भाजपचा त्याच्याशी काही संबंध नाही. इतकेच नव्हे तर पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागितली असून हे पुस्तक मागे घेतले आहे, असे जावडेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तत्पूर्वी लेखक जयभगवान गोयल यांनी पक्षाने आदेश दिला तर पुस्तक मागे घेऊ, असे म्हटले होते. छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रकारे काम करत असत, त्याच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करत असल्याने आपण मोदी यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असे गोयल यांनी म्हटले आहे. तसेच, कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असेही ते म्हणाले होते.

तत्पूर्वी, छत्रपती शिवरायांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणार्‍या ’आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपने देशाची माफी मागावी, तसेच या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, यांनी सोमवारी केली होती.

शिवाजी महाराज हे एकमेव अद्वितीय असे व्यक्तिमत्त्व होते. जगाच्या अंतापर्यंत असा राजा पुन्हा निर्माण होऊ शकणार नाही. महाराष्ट्राच्या अपमानाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी क्षमा मागावी, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. शिवाजी महाराजांवर प्रेम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला याचा राग येणे अगदी साहजिक आहे. या पुस्तकावर बंदीच घातली पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी केली होती.

अतिउत्साही नेत्यांना जरा आवरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले संतापले आहेत. पक्षातील अतिउत्साही कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना आवर घाला, अशी विनंती शिवेंद्रराजे यांनी पक्षश्रेष्ठांना केली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर टाकला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा