सोनियांचा घाणाघात

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशातील नागरिकांची दिशाभूल करीत आहेत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी जोरदार टीकास्त्र सोडले.

केंद्रातील मोदी सरकार राज्यघटनेला कमकुवत करीत आहे, सरकारकडून नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात आहे. नागरिकांचे सांप्रदायिकतेच्या आधारावर विभाजन केले जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

सोनिया यांच्या अध्यक्षतेखाली काल विरोधी पक्ष नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीत सीएए विरोधी आंदोलन, जेएनयू, ‘जामिया’ आणि अन्य काही विद्यापीठांत झालेल्या हिंसाचारानंतर उद्भवलेली परिस्थिती, देशातील आर्थिक मंदी, बेरोजगारी, कृषी संकटावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, ए. के. अँटनी, के. सी. वेणुगोपाल, गुलाम नबी आझाद, रणदीप सुरजेवाला, सीताराम येचुरी, डी. राजा, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राजदचे मनोज झा, अजित सिंह आदी उपस्थित होते.
पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे देशातील नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. या दोन्ही नेत्यांनी काही आठवड्यांपूर्वी केलेल्या स्वतःच्या विधानाचे त्यांनीच खंडण केले आहे, असे सोनिया यावेळी म्हणाल्या. मोदी-शहा यांच्याकडून आक्षेपार्ह विधाने करण्यात आली असून, त्यांनी असे करणे कायम ठेवल्याचेही सोनिया म्हणाल्या.

या बैठकीनंतर राहुल म्हणाले, ‘केंद्र सरकारकडून युवकांचा आवाज दाबला जात आहे. महत्त्वाच्या विषयांवर ते बोलायला तयार नाहीत. अर्थव्यवस्थेसंदर्भातही ते चकार शब्द काढत नाहीत.’

शिवसेना, तृणमूल, बसप, आप नेत्यांची अनुपस्थिती
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात काँग्रेसने राजधानी दिल्लीत बोलाविलेल्या बैठकीकडे शिवसेना, तृणमूल काँग्रेस, बसप आणि आम आदमी पक्षांसमवेत अनेक पक्षांनी पाठ फिरवली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी आधीच आपण या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे म्हटले होते.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस व डावी आघाडी चुकीचे राजकारण करत आहेत. त्यामुळे आता आम्ही स्वतःच्या बळावरच सीएए आणि एनआरसीचा विरोध करणार आहोत, असे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

तर, मायावती यांनी ट्विटद्वारे काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना, राजस्तानमध्ये काँग्रेस सरकारला बसपने बाहेरून पाठिंबा दिलेला असताना, त्यांनी दुसर्‍यांदा त्या ठिकाणी बसपचे आमदार फोडून त्यांना आपल्या पक्षात सहभागी करून घेतले, हे पूर्णपणे विश्वासघातकी आहे. अशा वेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होणार्‍या विरोधकांच्या बैठकीस हजर राहणे म्हणजे, राजस्तानमधील पक्षातील कार्यकर्त्यांच्या मनोबलाचे खच्चीकरण केल्यासारखे ठरेल, असे स्पष्ट करतानाच बसप सीएए आणि एनआरसी आदींच्या विरोधात आहे. केंद्र सरकारने हा विभाजन करणारा व घटनाबाह्य कायदा परत घ्यावा, असे सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा