मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते,साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यानी ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकाविषयी बोलताना शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. शिवसेनेने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सोयीचे राजकारण केले. महाशिवआघाडीतील ‘शिव’ का काढून टाकले, असा प्रश्न करतानाच महाराजांचे नाव घेत असाल तर त्या प्रमाणे वागा, असा सल्लाही उदयनराजेंनी शिवसेनेला दिला. शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना ‘आता शिवसेना हे नाव काढून ठाकरे सेना करा’ असे त्यांनी शिवसेनेला सुनावले.

पुस्तकाचा निषेध
‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी यावर बोलावे असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला उत्तर देताना उदयनराजे यांनी शिवसेनेचे महाराजांवरील प्रेम बेगडी असल्याचे दाखले दिले. जेव्हा सोयीचे असेल, तेव्हा महाराजांचेन नाव घ्यायचे आणि सोयीचे नसेल तेव्हा ते काढायचे ही शिवसेनेची नीती असल्याचे उदयनराजे म्हणाले. या वेळी उदयराजे यांनी या वादग्रस्त पुस्तकाचाही निषेध केला.

पक्ष त्यावेळी वंशज आठवले का?
वादग्रस्त पुस्तकावर आता वंशजांनी बोलावे या संजय राऊत यांच्या विधानाची गंभीर दखल घेत उदयनराजेंनी संजय राऊत आणि शिवसेनेवर आपल्या शैलीत जोरदार प्रहार केले. शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारायला आले होते का, असा सवाल त्यांनी केला. यांनी महाशिवआघाडी, शिव का काढून टाकले?, सोई प्रमाणे वापर करायचा सोईप्रमाणे महाराजांचं नाव काढून टाकायचं. शिववडा, हे वडा तो वडा. छत्रपती शिवाजी महाराजांना आदराचे स्थान आहे आणि तुम्ही वडापावला महाराजांचे नाव देता, अशा शब्दांत उदयराजेंनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले.

हा सगळा ब्लेम गेम
उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत बोलताना काही शिवसेना भवनाचे फोटो दाखवले. या फोटोत शिवसेना भवनाच्या इमारतीवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वरच्या बाजूस, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो खालील बाजूस होता. या फोटोत महाराज कुठे आणि बाळासाहेब ठाकरे कुठे, असे म्हणत शिवसेनेने महाराजांचा अपमान केल्याचे उदयनराजेंनी अधोरेखित केले. त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषभूषेतील आमदार गजभिये मुजरा करतानाचा फोटोही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवला. काही लोक गळ्यात पट्टे बांधलेले असतात. ते लुडबुड करत असतात असे सांगत मला कुणाचे नाव घेऊन कुणाला मोठे करायचे नाही. तो मोठा कधीच नव्हता… हा ब्लेम गेम सुरू आहे,असेही ते म्हणाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा