कोलकाता : नागरिकत्व कायद्याबाबत अफवा पसरवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे. हा कायदा नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सुधारित नागरिकत्व कायद्याची जोरदार पाठराखण केली.

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी काल बेलूर मठाला भेट दिली. ते म्हणाले, हा कायदा नागरिकत्व देणारा आहे, नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही. हा कायदा एका रात्रीत नव्हे, तर विचारपूर्वक तयार करण्यात आला आहे. मात्र, काही राजकीय पक्ष जाणूनबुजून समजावून घेत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षांवर निशाणा साधला.

मोदी म्हणाले, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तरुणांच्या मनात या कायद्याबाबत शंका निर्माण केल्या आहेत. अनेक तरुण या अफवांचे बळी ठरले आहेत. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त या तरुणांना समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे. दुसर्‍या देशातला कुणीही नागरिकत्व घेऊ शकतो हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा केवळ सध्याच्या कायद्यात केलेली दुरुस्ती आहे. फाळणीमुळे ज्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले, त्यांना भारतीय नागरिकत्व द्यायला पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. जे गांधीजींनी सांगितले त्याचे पालन आम्ही केले.

सीएएने पाकिस्तानला उघडे पाडले
नवीन नागरिकत्व कायद्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या छळाची जाणीव जगाला झाली आहे. यामुळे पाकिस्तान जगासमोर उघडा पडला असून, अल्पसंख्याकांवर अत्याचार का केले, याचे उत्तर पाकिस्तानला द्यावे लागेल, असेही मोदी म्हणाले.

‘कटमनी’साठी केंद्राच्या योजना नकोत?
कटमनी मिळत नाहीत, त्यामुळे राज्य सरकार केंद्राच्या योजना लागू करत नाही, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता केला. पश्चिम बंगालमधील सरकार आयुष्मान भारत योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता देईल, त्यावेळी येथील लोकांना या योजनांचा लाभ मिळेल. या योजनांना सरकार मान्यता देईल की नाही हे मी सांगू शकत नाही. जर योजना राबवण्यास मान्यता दिली तर, येथील लोकांनाही त्यांचा लाभ मिळेल, असे ते म्हणाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा