भास्कर चंदनशिव यांची खंत

संत गोरोबाकाका साहित्य नगरी, उस्मानाबाद : सद्यःस्थितीत आर्थिक आणि सामाजिक प्रश्न बिकट होत असताना कृषिप्रधान देशाचा नायक मात्र आत्महत्या करीत आहे. साहित्यात प्रचंड ताकद असते. त्यामुळे शब्दांच्या माध्यमातून शेतकर्‍याला बळ देऊन आत्महत्येपासून परावृत्त करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी रविवारी केले.

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काल ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव, हिंदी साहित्यिक लक्ष्मणराव शिरभाते आणि प्रकाशक सुमती लांडे यांचा ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष विद्या देवधर, कार्यवाह डॉ. दादा गोरे आणि शेषराव मोहिते उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासून साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल या तिघांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना चंदनशीव बोलत होते.

चंदनशीव म्हणाले, माझा सन्मान हा खेड्यापाड्यात राबणार्‍या शेतकरी वर्गाचा सन्मान आहे. अवतीभवतीच्या संभ्रमातून सामान्य माणसाला बाहेर काढण्याचे बळ साहित्यात आहे. माणूस माणसापासून दुरावणे यासारखे सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यांना साहित्यातून ऐरणीवर आणता येईल. बाराव्या शतकात हा संभ्रम सुरु झाला. देवगिरीच्या सम्राटाचा पराभव झाला आणि सोबतच सतत बारा वर्षे दुष्काळ पडला. या बिकट परिस्थितीत लोकांना संयम सांगणारी चळवळ उदयाला आली. सध्या आत्महत्येपर्यंत पोहोचलेल्या शेतकरीवर्गाला परत आणण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे. कारण शब्दात शास्त्र आणि शस्त्र आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा