नवी दिल्ली : बॉम्बे डाइंगचे अध्यक्ष नुस्ली वाडिया यांनी रतन टाटा आणि इतर ११ जणांविरोधात केलेला अब्रुनुकसानीचा खटला मागे घेतला. टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयात वाडियांच्या बदनामीचा कोणताही हेतू नव्हता, असे लेखी निवेदन दिल्यानंतर वाडिया यांनी टाटाविरोधातील ३००० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला मागे घेतला.

सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश शरद बोबडे, बी.आर. गवई आणि सूर्या कांत यांच्या खंडपीठापुढे गेल्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी झाली होती. ज्यात खंडपीठाने वाडिया आणि टाटा यांना हे प्रकरण आपसांत सामोपचाराने मिटविण्याचा सल्ला दिला होता. आपण उद्योग जगतातील प्रतिष्ठित उद्योजक आहात. त्यामुळे तुम्ही आपसांत बसून हा प्रश्न का सोडवत नाहीत, अशी सूचना खंडपीठाने केली. आज तुमचे वय पाहता अशा प्रकारे खटले दाखल करणे योग्य नाही, असे खंडपीठाने म्हटले होते. तसेच हा निर्णय नसून सल्ला आहे,असे स्पष्ट केले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी वाडिया यांनी टाटांविरोधातील अब्रुनुकसानीचा खटला मागे घेतला. तत्पूर्वी टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयात एक निवेदन सादर केले. ज्यात वाडिया यांच्या बदनामीचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले. यावर समाधान झाल्याने वाडिया यांनी खटला मागे घेण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. वाडिया यांच्या निर्णयाचे न्यायालयाने स्वागत केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा