नवी दिल्ली: ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकाला विरोध होऊ लागल्यानंतर या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी एक पाऊल मागे घेत भूमिका घेतली. पक्षाने आदेश दिल्यास हे पुस्तक मागे घेऊ, असे लेखक जयभगवान गोयन यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रकारे काम करत होते, त्याच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करत असल्याने आपण मोदी यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असे गोयल यांनी म्हटले.या पुस्तकाद्वारे कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले.

पुस्तकावरील वादानंतर पुस्तक मागे घेणार का असा प्रश्न गोयल यांना विचारल्यावर, ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे आपले पुस्तक आता बाजारात आले असून, जर पक्षाने सांगितले, तर पुस्तक मागे घेऊ,असे गोयल यांनी म्हटले. बरेचजण राम, कृष्ण असे म्हणत लोकांची तुलना देवांशी करतात. मी काही चुकीचे काम केले असे मला वाटत नाही, असेही गोयल म्हणाले.

आपल्या पुस्तकाचे समर्थन करताना गोयल म्हणाले की,”आपण पाहिले असेल की, बऱ्याच वर्षांपासून भारताला कुणीही वाली नव्हता. देशाच्या संसदेवरही दहशतवादी हल्ला झाला. मुंबईतही दहशतवादी हल्ला झाल्याचेही आपण पाहिले आहे. मात्र, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून देशामध्ये एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला होता. या हल्ल्याला पाकिस्तानमध्ये घुसून मोदी सरकारने प्रत्युत्तर देण्याचे काम केले.छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच राज्यातील प्रत्येक व्यक्ती, माता, बहिणींची चिंता वाहिली. त्याच प्रमाणे पंतप्रधान मोदी हे देखील देशातील माता आणि बहिणींच्या सुरक्षेसाठी काम करताना दिसत असल्याचे गोयल म्हणाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा