संजय ऐलवाड
संत गोरोबाकाका साहित्य नगरी, उस्मानाबाद : जातीयवाद सबंध वाङ्मयाला पोखरणारा आहे. दहशतवादावर आपण बोलता. मात्र जातीय दहशतवादावर कोण बोलणार? जातीतील लेखकालाच पुरस्कार देण्याचा प्रकार वाढला आहे. हा जातीवाद वाङ्मयाचे तुकडे करणारा आहे, असे खडे बोल ज्येष्ठ ग्रामीण कथाकार रा. रं. बोराडे यांनी लेखकांना रविवारी सुनावले.


93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, उपाध्यक्ष विद्या देवधर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळूंखे, मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्ष उषा तांबे, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, प्रमुख कार्यवाह रविंद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे, पुणे मसापच्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार, प्रतिनिधी राजन लाखे आदी उपस्थित होते.


बोराडे म्हणाले, चांगला लेखक होण्यासाठी आधी चांगले वाचक व्हा. राजकारण्यांना आपण नाव ठेवतो. मग लेखक सर्जनशीलतेच्या पातळीवर विषय का हाताळत नाहीत. मराठीत राजकीय लेखन खूपच कमी आहे. बाल साहित्याकडे कोणाचे लक्ष आहे? साहित्यिक आत्मकेंद्रित आहेत. सगळे मलाच हवे, ही प्रवृत्ती लेखकांत वाढली असल्याचेही बोराडे यांनी नमूद केले.


उस्मानाबादकरांनी यशस्वी संमेलनाचा आदर्श निर्माण केला आहे. महामंडळाने महानगरात संमेलन घेणे कमी करावे. जिथे विचार आणि साहित्याची भूक आहे तेथेच संमेलने दिली जावीत. संमेलनाची सूत्रे राजकारण्यांची हाती देण्यात आली नाहीत, ही आनंदाची गोष्ट आहे. साहित्यिक वातावरण निर्माण करण्यासाठीच संमेलने घेतली पाहिजेत. त्यातून वाचक, प्रकाशक, साहित्यिक निर्माण होतील. मराठीचा वाचक कमी होतोय. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात एक जरी पुस्तक वाचले गेले, तर मराठी टिकेल. दहा पटीने वाचल्यानंतर मी एक पट लिहितो. लेखकांनी अनुभवाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. टीकेवर लक्ष देऊ नका. पुरस्काराच्या मोहात आणि मोहजाळात अडकायचे नसल्याचे ठरविले आहे. घोडनवरा व्हायचे नाही, असे ठरविले असल्याचेही बोराडे यांनी सांगितले. नितीन तावडे यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनाचा समारोप संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांचे लिखित भाषण वाचून करण्यात आला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा