श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. रविवारी सुरक्षा दलाने या दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर त्राल परिसरात सर्च ऑपरेशन करण्यात आले.

जम्मू-काश्मीर पोलिसांना त्रालमध्ये दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार काल जम्मू-काश्मीर पोलीस व सुरक्षा दलाच्या जवानांनी त्रालमधील गुलशनपोरा परिसरात शोधमोहीम हाती घेतली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार केला. त्यामुळे सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले. रात्री उशिरापर्यंत गुलशनपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. 

दोन दहशतवाद्यांसह पोलीस उपअधीक्षकाला अटक
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांसह जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्याच पोलीस उपअधीक्षकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पोलीस उपअधीक्षकाला राष्ट्रपती पदक पुरस्कारानेही गौरवण्यात आलेले आहे. देविंदर सिंह असे या पोलीस अधिक्षकाचे नाव असून, ते विमानतळ सुरक्षेसाठी तैनात होते. दहशतवाद्यांना काश्मीर खोर्‍यातून बाहेर पडण्यासाठी देविंदर सिंह मदत करत होते, असा त्यांच्यावर आरोप आहे.


कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंडच्या मीर बाजार परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांसोबत मोटारीने जात असताना देविंदर सिंह यांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत सय्यद नवीद मुश्ताक उर्फ नवीद बाबू आणि आसिफ राथर या दोन दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली. दरम्यान, 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर देविंदर सिंह यांचे नाव चर्चेत आले होते. त्यावेळी ते पोलीस निरीक्षक असताना स्पेशल ऑपरेशन ग्रुपमध्ये सामील होते. दहशतवादविरोधी मोहिमेनंतर त्यांचे प्रमोशन झाले. त्यानंतर त्यांची पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा