पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेड तालुक्यातील निर्मला पानसरे यांची तर उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील रणजित शिवतारे यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचेच होणार हे निश्चित होते. यावेळी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने 18 महिला सदस्या इच्छुक होत्या. तर आता काही दिवसांनी इतर विषय समितींच्या सभापतींच्या निवडी केल्या जाणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाकडून नावांची घोषणा केली होती, त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली.
जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा पानसरे या खेड तालुक्यातील बहुळ गावच्या असून 2012 ते 2017 या कालावधीत त्या गावाच्या सरपंच होत्या. त्यांचे माहेर शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई हे गाव असून त्यांचे शिक्षण बीए (इंग्लिश) झाले आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे हे भोर तालुक्यातील उत्रौली गावाचे असून, त्यांचे शिक्षण बीई मेकॅनिकल इंजिनियर, एमबीएपर्यंत झाले आहे. त्यांनी यापूर्वी 2007 मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापतिपद भूषविले आहे. त्यांचे आजोबा अप्पासाहेब शिवतरे यांनी सलग 10 वर्षे तालुका पंचायत समितीचे सभापतिपद तर त्यांचे वडील शिवाजीराव शिवतरे हे भोर तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष होत.
अध्यक्षपदासाठी निर्मला पानसरे आणि उपाध्यक्षपदासाठी रणजीत शिवतरे या दोघांचेच उमेदवारीअर्ज दाखल झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वसाधारण सभेत या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. मावळते अध्यक्ष विश्वास देवकाते, खेडचे आमदार दिलीप मोहिते, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी निवडीनंतर नव्या पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या अजेंड्यावर पहिल्या मजल्यावर निवड प्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात पाचव्या मजल्यावर निवड प्रक्रिया घेण्यात आल्याने काही महिला सदस्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध पार पडली.

सामान्य घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित या सर्व घटकांसाठी काम करणार असून, त्यांच्यासाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचा असलेला नावलौकिक आणखी वाढवण्यासाठी मी कटिबद्ध असेन. सर्व सहकार्‍यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेचे कामकाज करेन.
निर्मला पानसरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद

आम्ही दोघे पदाधिकारी पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागातील आहोत. पुणे शहराच्या सभोवताली आणि पूर्व, पश्चिम भागातील नागरिकांचे प्रश्न वेगळे आहेत. या पूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला. पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार होत आहे. तो विकास आराखडा अवलोकनासाठी जिल्हा परिषदेकडे येणार आहे. त्यावेळी सर्वांना विचारात घेऊन आणि जनतेच्या हिताचा विचार करून सूचना हरकती नोंदवू. जिल्हा परिषदेने उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मुद्रांकावर अवलंबून राहून चालणार नाही. जिल्ह्यातील 498 पाणी योजनांना गती मिळेल.
रणजीत शिवतरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा