वामनराव पै

ग्रंथाची एकदा संगत लाभली, सहवास लाभला की हळूहळू त्या ग्रंथाबद्दल आपल्याला गोडी निर्माण होते. तो ग्रंथ वाचायला घेतल्यानंतर तो ग्रंथ लिहिणार्‍याचा काहीतरी हेतू आहे. वाचायला घेतल्यावर नुसते भरभर वाचण्यासाठी तो ग्रंथ नाही. त्या ग्रंथातून त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचे आहे. काय सांगायचे आहे हे शोधून काढणे म्हणजे पारायण वाचन. पारायण किंवा वाचन म्हणजे काय त्या ग्रंथातून लेखकाला आपल्याला काय सांगायचे आहे, काय सुचवायचे आहे, काय उपदेश, काय आदेश द्यायचा आहे हे शोधून काढायचे हा एक भाग व ते पुढे आपण आपल्या जीवनांत आचरणांत आणणे हा दुसरा भाग झाला. प्रथम त्यांना काय सांगायचे आहे हे समजणे व ते उमजण्यासाठी त्याप्रमाणे आचरण करणे. हे एवढे आपण करू तेव्हा त्या ग्रंथाचा हेतू सफल झाला. हयाबाबतीत नामदेव महाराजांचा एक अभंग सुंदर आहे, नामा म्हणे ग्रंथ शेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी तरी हा शब्द वापरलेला आहे. अरे तू एक तरी ओवी अनुभव. मग काय होईल तुला सगळी ज्ञानेश्वरी कळेल. हा त्याचा खरा गर्भित अर्थ आहे. त्याचा खरा गर्भित अर्थ असा आहे की तुला एक जरी ओवी समजली ना मग सगळी ज्ञानेश्वरी समजेल. तुम्ही जेव्हा भात शिजवता व तो शिजला की नाही हे बघता तेव्हा एक तांदूळ, दोन तांदूळ असे बघत नाहीत तर दोन चार शिते शिजली म्हणजे सगळा भात शिजला तसे ज्ञानेश्वरीच्या एकदोन ओव्या अनुभवाला घेतल्या तर संपूर्ण ज्ञानेश्वरी आपल्याला कळते. तुम्ही म्हणाल कशावरून? हे मी तुम्हांला अनुभवावरून सांगतो. मी एक ओवी अनुभवाला घेतली, नामजप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्मे, नामे पावन धर्माधर्म नाम परब्रम्ह वेदार्थे. मी मनापासून ठरविले की ही ओवी अनुभवाला घ्यायची व नाम घ्यायला सुरवात केली. नाम घेता घेता नामाची गोडी लागली व आतुन विठ्ठल सांगू लागला. तुकाराम महाराज म्हणतात, कळे ना कळे त्या धर्म ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा, तो हया दाखविल वाटा पाहिजे त्या नीटा, कृपावंत मोठा पाहिजे तो कळवळा. एकदा तुम्ही नामस्मरण करायला सुरवात केली की तो आतून तुम्हांला मार्गदर्शन करायला लागतो म्हणून नामस्मरण करणे, प्रार्थना म्हणणे हया गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे तुमच्या लक्षांत येईल. ज्ञानेश्वरीची ही एक ओवी मी अनुभवाला घेतली व जिथे असेन तिथे व जितके करता येईल तितके अशा तर्‍हेने मी नामस्मरण केले. इतके केले की त्याला तोड नाही. मी इथपर्यंत जो आलेलो आहे ते नामामुळे हे मला सांगायचे आहे.

(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा