मुंबई : अमेरिका आणि इराणमधील तणावाचा शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी तब्बल 787.98 अंकांनी कोसळून 40,676 अंकांवर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 233 अंकांनी कोसळून 11,993 अंकांवर बंद झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल तीन लाख कोटींचे नुकसान झाले आहे. धातू, बँका आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्सना काल मोठा फटका बसला.
काल मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक उघडताच 450 अंकांनी घसरला. तर, निफ्टी 144.45 अंकांच्या घसरणीसह 12,082.20 अंकांवर आला. मागच्या आठवड्यात तज्ज्ञांनी तशी भीती व्यक्त केली होती.

अमेरिका आणि इराणमधील संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी काल विक्रीचा मारा सुरू केला. आशियासह प्रमुख बाजारात त्याचे पडसाद उमटले. सिंगापूर आणि जपानमधील बाजारात नकारात्मक सुरुवात झाली.

मुंबई शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात निर्देशांकात एसबीआयमध्ये 2.91 टक्के घसरण पहायला मिळाली. या व्यतिरिक्त एशियन पेंट, पॉवरग्रीड, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, आयटीसी, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, रिलायन्स, मारुती यांचे शेअर घसरले. तर, टायटन, टीसीएस, ओएनजीसी, इन्फोसिस आणि भारती एअरटेल हे शेअर तेजीत होते.

दुपारी 12.30 वाजता मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजार भांडवल 154 लाख कोटींपर्यंत कमी झाले. बाजार सुरू होण्यापूर्वी बाजार भांडवल 157 लाख कोटी इतके होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा