‘केसरी’ची उज्ज्वल परंपरा

लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी व जनतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी वृत्तपत्राचे महत्त्व ओळखून 4 जानेवारी 1881 रोजी केसरीची सुरुवात केली. केसरीतून अनेक जहाल लेख लिहून लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेले हे वर्तमानपत्र आज 139 वर्षांनंतरही तितकेच लोकप्रिय आहे. केसरीने आपली उज्ज्वल परंपरा आजही टिकवून ठेवली आहे. सतत 139 वर्षे मराठी मनावर अधिराज्य गाजवण्याचा पराक्रम केसरीने केला आहे. केसरीने नेहमीच अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार या विरोधात आवाज उठवला आहे. ज्या ज्या वेळी शासनकर्ते चुकतील त्या त्या वेळी त्यांचे कान पकडण्याची भूमिका केसरीने घेतली आहे. केसरीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा आवाज बनून केसरीने काम केले आहे. म्हणूनच समाजातील शेतकरी, कष्टकरी, दीन दुबळे, वंचित वर्गाचे प्रश्न केसरीने सातत्याने मांडले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेले केसरी हे वर्तमानपत्र आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. नि:स्पृह, निर्भीड केसरीने लोकशाहीचा चौथा स्तंभ हे आपले बिरुद सार्थ ठरवले आहे. केसरीतील अग्रलेख, साहित्य, रविवारची पुरवणी खूपच दर्जेदार असते. वाचक लिहितात व केसरी व्यासपीठ या सदरांमधून थेट वाचकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली जाते. त्यामुळे वाचकांना आपले म्हणणे, आपल्या समस्या मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळाले आहे. दर शनिवारी प्रसिद्ध होणार्‍या छावा पुरवणीतून बालगोपालांना दर्जेदार लेख, बोधकथा, शैक्षणिक संवाद, कविता, इंग्रजी साहित्य वाचायला मिळते. केसरी नव्या वर्षात देखील आपली ही परंपरा टिकवून वाचकांना ज्ञानामृत देत राहणार यात शंका नाही. केसरीच्या वर्धापन दिनानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा!

श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड, जि. पुणे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा