नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्याच्या नावाखाली दिल्लीमध्ये जो हिंसाचार करण्यात आला, त्यासाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केला.

केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला काँग्रेससह अन्य पक्षांकडून होणार्‍या विरोधाच्या पार्श्वभूमीवर टिप्पणी केली आहे. दिल्ली सारख्या शांततामय शहरात सुधारित नागरिकत्व कायद्या बद्दल चुकीची माहिती पसरवून जे वातावरण निर्माण करण्यात आले व येथील संपत्तीचे जे नुकसान झाले, त्यासाठी काँग्रेस व आम आदमी पक्ष जबाबदार आहे, त्यांनी जनतेची माफी मागायला हवी, असे जावडेकर यांनी म्हटले आहे.

जामिया परिसरात झालेल्या हिंसाचारासाठी काँग्रेसचा नेता आसिफ खान व आम आदमी पक्षाचा आमदार अमानतुल्ला यांनी लोकांना भडकाविले होते. सीलमपूर भागात झालेल्या हिंसाचारावेळी काँग्रेसचा मतीन अहमद आणि आपचा इशराक खान उपस्थित होते. जामा मशिदीजवळ झालेल्या हिंसाचाराच्या ठिकाणी काँग्रेसचा महमूद पारवा उपस्थित होता. हिंसेमुळे झालेल्या नुकसानीची आप आणि काँग्रेसने जबाबदारी स्वीकारायला हवी, असे जावडेकर पुढे म्हणाले. गेल्या ४ वर्षांमध्ये केजरीवाल सरकारने काहीच काम केले नाही. मात्र, विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर काम केल्याचा दिखावा करत असल्याचेही जावडेकर म्हणाले.

भाजपने दुसर्‍यांवर आरोप करण्यापूर्वी आपल्या पक्षाचा इतिहास तपासून घ्यावा, असा पलटवार आपचे नेते संजय सिंह यांनी केला. देशामध्ये द्वेष आणि दंगली पेटवून राजकारण करण्याचा भाजपचा इतिहास आहे. जेव्हा भाजपचे नेते हिंसेविरुद्ध भाषण देतात, तेव्हा गब्बर सिंह अहिंसावर उपदेश देत असल्यासारखे वाटते, असे संजय सिंह म्हणाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा