सुनिल लिमये

वन्य प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आपण अभयारण्यं आणि राष्ट्रीय उद्यानांची निर्मिती केली. वन्यजीवांनी या खास त्यांच्यासाठी संरक्षित केलेल्या स्थळीच रहायला हवं, ही झाली आपली संकल्पना. मात्र वन्यजीवांना हा नियम अजिबात बंधककारक नाही. निवारा आणि खाद्य मिळेल तिथे जाणं ही त्यांच्याकडे असणारी निसर्गदत्त प्रेरणा आहे. दुसरं म्हणजे वन्य जीव नेहमीच मनुष्यवस्तीच्या जवळपास रहात आले आहेत. त्यामुळेच आपल्या संस्कृतीत आणि पौराणिक कथांमध्येदेखील त्यांचं स्थान महत्त्वपूर्ण राहिलं आहे. देवतांची वाहनं म्हणून काही प्राण्यांचा उल्लेख होतो तो या निकटच्या सहवासामुळेच!

अशी जवळीक असल्यामुळेच वन्यजीवांना संरक्षण देण्याचं, त्यांना सांभाळण्याचं बाळकडू आपल्याला मिळालं आहे. पण काळ पुढे सरला तशी मनुष्यसंख्या वाढली, अतिक्रमणं वाढली, जंगलांमध्ये जाणार्‍या लोकांची संख्या वाढली, जंगलतोडीचं प्रमाण वाढलं. या बदलामुळे वन्यजीवांचा अधिवास आक्रसू लागला आणि संघर्षाच्या ठिणग्या पडू लागल्या.

मी २०११ मध्ये बोरिवली नॅशनल पार्कमध्ये रुजू झालो. त्यावेळी आमच्यासमोर दोन महत्वाचे मुद्दे होते. एक म्हणजे तिथे होणारं अतिक्रमण आणि दुसरं म्हणजे तिथला वन्य जीव आणि माणूस यांच्यामधला वाढता संघर्ष. त्या सुमारास बिबट्यांच्या हल्ल्यामुळे हे राष्ट्रीय उद्यान कुप्रसिद्ध झालं होतं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बरेच बिबटे आहेत. जंगलामध्ये खाद्य नसल्यामुळे ते बाहेर येऊन मनुष्यवस्तीत शिरतात, असा अनेकांचा समज होता, असं नव्हे तर तसा आक्षेपही होता. मानवी वस्तीत बिबटे शिरल्याच्या काही घटना समोर आल्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचं आणि वनविभागाप्रती नाराजीचं वातावरण होतं. या पार्श्वभूमीवर बिबट्यांसंबंधी बरंच मोठं काम करणार्‍या विद्या अर्थेय नावाच्या मैत्रिणीने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एखादा प्रोजेक्ट राबवण्याची कल्पना माझ्याजवळ बोलून दाखवली. याद्वारे बिबट्यांबाबत लोकांच्या मनात असणारे गैरसमज दूर करण्याचा तिचा मानस होता.

मी तिच्या या इच्छेला दुजोरा दिला आणि एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी केली. त्याअंतर्गत माणूस-वन्यजीव संघर्ष का होतो, हे प्रथमत: आम्हाला समजावून सांगायचं होतं. एकदा कारणं स्पष्ट झाली की या समस्येचं निराकरण करणं सोपं होतं. हा प्रश्न घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो तेव्हा वन्य जीवांना राष्ट्रीय उद्यानातच कोंडून ठेवा, अशी त्यांची आग्रही मागणी होती. मात्र कोणतंही राष्ट्रीय उद्यान हा काही पिंजरा नसतो. त्याभोवती संरक्षक भिंत असली तरी ती माणसांनी आत येऊ नये म्हणून घातलेली असते. वन्यजीवांना अशा कोणत्याही बंधनात ठेवता येत नाही. मुख्य म्हणजे केवळ त्यांच्यासाठी संरक्षित केलेल्या क्षेत्रातच नव्हे तर काही बिबट्यांचा जन्म या संरक्षित क्षेत्राच्या बाहेरही होत असतो.मुंबईबाबतच बोलायचं झाल्यास काही बिबट्यांचा जन्म बोरिवली नॅशनल पार्कमध्ये होतो तसाच काहींचा आरे कॉलनीतही होतो. तिथल्या मनुष्यवस्तीलगतच्या परिसरातच पिल्लांची वाढ होते. अगदी फिल्म सिटीचं उदाहरण घ्यायचं तर इथे नेहमीच मोठे मोठे सेट लागलेले असतात. तिथे लोकांची वर्दळ पर्यायाने कचराही खूप असतो. कचर्‍यातल्या खाण्यायोग्य पदार्थांवर बिबट्याची मादी जगते. तिथेच तिला पिल्लं होतात आणि तीही त्याच गचपणात वाढतात. हा प्राणी सेटच्या खाली, एखाद्या पडक्या भिंतीमागे सहजतेने राहतो.

आजूबाजूच्या स्थितीशी जुळवून घेण्याची विलक्षण क्षमता असल्यामुळे त्यांना माणसांचा शेजार अजिबात वर्ज्य नसतो. लपलेल्या ठिकाणावरुन ते माणसं बघत असतात. मात्र एखादा माणूस त्यांना बघतो तेव्हा ‘बिबट्या आला’ असा आरडाओरडा होतो. या प्रकाराची मोठी बातमी होते आणि या घटनेला मनुष्य विरुद्ध वन्यजीव असं वळण देण्याचा प्रयत्न होतो. हे टाळण्यासाठी आम्ही लोकांना बरोबर घेऊन काम करायचं ठरवलं. सुरूवात माध्यमांपासून केली. कारण ‘अमक्या तमक्या परिसरात बिबट्याची दहशत’ अथवा ‘मानवी वस्तीत बिबट्याचा शिरकाव’ असा गलका करत या माध्यमातूनच बातम्या पसरवल्या जातात. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही संबंधित परिसरात पहायला मिळालेला हा बिबट्याचा कहर नसून ती त्याची जागाच आहे हे सांगायला सुरूवात केली. त्यानंतरच्या टप्प्यात आम्ही पोलिसांना बरोबर घेतलं. काम करताना आम्हाला नेहमीच पोलिसांची मदत लागते. समजा, आरे कॉलनीमध्ये बिबट्या दिसला तर बघ्यांची मोठी गर्दी जमते. या गर्दीमुळे बिबट्याला पकडण्यात अनेक अडचणी येतात. अशा वेळी पोलिसांनी गर्दी हटवली तर आमचं काम सोपं होतं.

पोलिसांप्रमाणेच आम्हाला मदत लागते ती महानगरपालिकेची. पण ती मिळण्यात बर्‍याच अडचणी येतात हा आमचा अनुभव होता. महानगरपालिकेतल्या अधिकार्‍यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली की या समस्येचा आणि आमचा काय संबंध, हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा. मग त्यांना समजावून सांगावं लागलं की तुम्ही सार्वजनिक स्थळी पडलेली घाण वेळच्या वेळी उचलत नाही. झोपडपट्टीलगतच्या रस्त्यांवर दिवे नसतात. असं असताना तिथले रहिवासी अंधारातच नैसर्गिक विधीला बसतात आणि बिबट्यांचे सहज बळी ठरतात. हे टाळायचं तर रस्त्यांवर दिवे लावा, रस्त्यांवरचा कचरा रोजच्या रोज उचला. हे केलं तर कुत्री आणि डुकरांची संख्या कमी होईल आणि खाद्य उपलब्ध न झाल्यामुळे बिबटे इकडे फिरकणार नाहीत, हे समजावून सांगितल्यानंतर पटलं आणि त्यांची चांगली मदत मिळू लागली.

या सगळ्याबरोबर आम्ही झोपडपट्टीतल्या लोकांनाही या समस्येप्रती सजग केलं. अशा प्रकारे सगळ्यांच्या मदतीने आम्ही प्रोजेक्ट सुरू केला. त्याचं नाव ठेवलं ‘मुंबईकर्स फॉर एसजीएनपी’. एसजीएनपी म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क. त्यानंतर आम्ही बिबट्यांचा वावर असणार्‍या आरे कॉलनी, मुलूंड, कांदिवली, गोरेगाव, फिल्मसिटी आदी भागातल्या लोकांना ‘या परिसरात तुमच्याप्रमाणेच बिबटेही राहतात, तुमच्याप्रमाणे हा त्यांचाही अधिवास आहे,’ असं समजावून सांगायला सुरूवात केली. त्यानंतर आम्ही बिबट्यांचा वावर असल्याचा संशय असणार्‍या ठिकाणी कॅमेरे लावले. साधारणत: दोन महिन्यांनंतर तपासणी करता या कॅमेर्‍यांच्या साह्याने जमलेल्या माहितीवरुन आम्हाला समजलं की बर्‍याच बिबट्यांचा मूळ अधिवास मानवी वस्तीजवळच होता. त्यातल्या काहींनी तर कधी बोरिवली नॅशनल पार्क पाहिलंही नव्हतं. म्हणजेच जन्मल्यापासूनच त्यांचा पत्ता मालाड, आरे कॉलनी, फिल्म सिटी असा होता.

त्यानंतर आम्ही कुत्र्यांच्या गणनेला सुरूवात केली. आरे कॉलनी, फिल्म सिटी सारख्या ठिकाणी गणना करताना एकेका परिसरात 70 ते 80 कुत्री असल्याचं समोर आलं. लोकांचा आक्षेप होता की संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये हरीण आणि सांबर यांची संख्या कमी असल्यामुळे बिबटे बाहेर येतात. पाहणीत राष्ट्रीय उद्यानात चितळ आणि सांबर यांची संख्या बरीच जास्त असल्याचं समोर आलं. मग असं असूनही बिबट्या त्यांची शिकार का करत नाही, याचं उत्तर शोधलं. कुत्रा ही सोपी शिकार आहे हे समजल्यामुळेच ते कुत्र्यांमागे येतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. नंतर आम्ही मिळालेली ही सगळी माहिती प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये मांडली आणि मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करायच्या यासंबंधी लोकांना माहिती देण्यास सुरूवात केली.

(लेखक अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव (पश्चिम), बोरिवली आहेत.)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा