एसपीजी सुरक्षा हटवल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्या निवासस्थानी सुरक्षेमध्ये त्रुटी आढळून आली आहे. यावर त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी भाष्य केले. संपूर्ण देशातल्या नागरिकांच्या सुरक्षेशीच तडजोड होत असल्याचा आरोप त्यांनी केला.वढेरा यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे याबाबत मत व्यक्त केले.

रॉबर्ट वढेरा पोस्ट मध्ये म्हणाले,“हा प्रश्न केवळ प्रियंका, माझी मुलगी किंवा मुलगा अथवा गांधी परिवाराच्या सुरक्षेचा नाही. हा प्रश्न आपले नागरिक, विशेषत्वाने आपल्या देशाच्या महिलांना सुरक्षित ठेवण्याचा आणि सुरक्षित वाटण्या बाबतचा आहे.संपूर्ण देशातच सध्या सुरक्षेशी खेळ होत आहे. मुलींसोबत छेडछाड, दुष्कृत्यांचे प्रमाण वाढले आहे. आपण कुठल्या प्रकारचा समाज होत आहोत. प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. जर आपण आपल्या देशात आणि घरातच सुरक्षित नाही. रस्त्यावर सुरक्षित नाही, दिवसा किंवा रात्रीही सुरक्षित नाही. तर आपण कुठे आणि कशा प्रकारे सुरक्षित राहू शकतो?, असा सवालही त्यांनी केला आहे.

सोमवारी आलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी सात अज्ञात व्यक्ती परवानगीशिवाय एका वाहनाने प्रियंका गांधी यांच्या लोधी इस्टेट येथील घराच्या आवारात घुसले होते. यामध्ये तीन पुरुष, तीन महिला आणि एका मुलीचा समावेश होता. हे लोक प्रियंका गांधी यांच्याजवळ जाऊन त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त करीत होते. प्रियंका गांधी यांनी त्यांच्यासोबत शिष्टाचाराने चर्चा केली. त्यानंतर या लोकांनी प्रियंका यांच्यासोबत फोटो घेतले आणि ते निघून गेले.

या घटनेनंतर प्रियंका गांधींच्या कार्यालयाने हा प्रश्न सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला होता. एसपीजी सुरक्षा हटवल्यानंतर प्रियंका यांना झेड प्लस सुरक्षा दिली.या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे म्हणणे आहे की,आपल्याला प्रियंका गांधींच्या निवासस्थानी घडलेल्या या घटना घटनेची माहिती नाही, याची माहिती मी घेईन आणि यावर भाष्य करेन.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा