भोपाळ : उद्योजक आणि बजाज समुहाचे अध्यक्ष राहूल बजाज यांनी केंद्र सरकारच्या धोरणां संदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी भाजपला घरचा आहेर दिला.“मध्य प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता असताना बरेच महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी मी काँग्रेसच्या नेत्यांची मदत घ्यायचे. मी स्वत: माझ्याच पक्षातील सरकारविरोधात बोलण्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून आपले मुद्दे मांडायची,”असे महाजन म्हणाल्या.भोपाळमधील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेष म्हणजे राज्यपाल लालजी टंडनही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

इंदूरमधून आठ वेळा खासदार राहिलेल्या महाजन यांनी राज्यामध्ये माझ्याच पक्षाचे सरकार असल्याने मला बऱ्याच गोष्टी उघडपणे बोलता यायच्या नाहीत अशी खंत आपल्या भाषणात बोलून दाखवली आहे. “मी स्वत: भाजप खासदार असल्याने आणि राज्यात शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचीच सत्ता असल्याने मला बऱ्याच गोष्टी बोलता यायच्या नाहीत. राज्यातील सरकार माझ्याच पक्षाचे असल्याने मला काही बोलता आले नाही. इंदूरमधील जनतेच्या हितासाठी काही मुद्दे सरकारच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे असे वाटल्यास मी ते मुद्दे सरकारसमोर मांडण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची मदत घ्यायचे,” असे महाजन म्हणाल्या. मध्य प्रदेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला. १५ वर्षानंतर भाजपचा पराभव झाल्यानंतर राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आले.

“राज्यात भाजपचे सरकार असल्याने मी जनतेच्या हिताचे महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी मी जीतू पटवारी आणि तुलसी सिलावट या काँग्रेसच्या नेत्यांची मदत घ्यायचे, असा खुलासा महाजन यांनी केला. सध्या राज्याचे शिक्षण मंत्री असणाऱ्या पटवारी यांनी आपल्या घरी एक संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राज्यपालांबरोबरच काही मंत्रीही उपस्थित होते. यावेळी बोलताना महाजन यांनी, “शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही कधीच राजकारण करत नाही. आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे असे सर्वच पक्षाच्या नेत्यांना वाटते. मी बऱ्याचदा यांना जितू आणि तुलसी यांना सांगायचे हे माझ्या पक्षाचे सरकार असल्याने मी थेट बोलू शकणार नाही तर तुम्ही हा मुद्दा मांडा. तुम्ही मुद्दा उपस्थित करा नंतर मी पुढचं बघून घेईन. मी शिवराज यांच्याशी बोलेन, मी हा विषय वरपर्यंत घेऊन जाईल तुम्ही फक्त तो मांडा असे मी त्यांना सांगायचे,” असा खुलासा महाजन यांनी केला.
काँग्रेसचे जीतू पटवारी माझे उत्तराधिकारी म्हणून योग्य असल्याचेही महाजन म्हणाल्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा