चेन्नई : भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचे अवशेष आढळल्याचा दावा अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने केला. विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधून काढण्याचं श्रेय मात्र नासाने चेन्नईतल्या षण्मुग सुब्रमण्यम या अभियंत्याला दिलं आहे. लँडरचे अवशेष आणि लँडर आदळलेली जागा शोधण्यात षण्मुगची मदत झाल्याचे नासाने सांगितलं आहे.

नासाने ट्विट करत लँडरचा ठावठिकाणा सापडल्याची माहिती देत छायाचित्रेही प्रसिद्ध केली. ‘सर्वप्रथम ज्या ठिकाणी लँडर आदळले, तेथून जवळपास ७५० मीटरवर षण्मुगने अवशेष पाहिले व त्याची माहिती दिली,’ असं नासाने सांगितलं आहे.

अधिक वाचा : विक्रम लँडरचे अवशेष सापडले

असा लागला शोध
अनेकांनी विक्रमसंबंधी माहिती मिळवण्यासाठी छायाचित्रे डाउनलोड केली. या छायाचित्रांद्वारे षण्मुगनं अवशेषांचा शोध लावला आणि एलआरओसीला माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर एलआरओसीच्या शास्त्रज्ञांच्या पथकानं आधीच्या आणि नंतरच्या छायाचित्रांची तुलना करून याला दुजोरा दिला. १७ सप्टेंबरला घेण्यात आलेल्या छायाचित्रात लँडर आदळलेले ठिकाण अस्पष्ट दिसत होते. मात्र १४, १५ ऑक्टोबर आणि ११ नोव्हेंबरला काढण्यात आलेली छायाचित्रे स्पष्ट होती. त्यानंतर अवशेष आणि आदळलेले ठिकाण याची खात्री करण्यात आली.

काय म्हणतो षण्मुग?
‘विक्रम लँडरचा संभाव्य मार्ग शोधण्यासाठी मी कठोर मेहनत केली. अंतराळातील घडामोडी जाणून घेण्याची मला पहिल्यापासूनच आवड आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे,’ अशी प्रतिक्रिया त्याने वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. या घटनेनंतर त्याने आपल्या ट्विटर बायोमध्ये ‘मी विक्रम लँडर शोधले’ असं अभिमानाने लिहिलं आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा