लखनऊ : राज्यात मेट्रो प्रकल्पासाठी वृक्षतोड झाल्यावर मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला होता. त्यानंतर झाडांच्या पुनर्रोपणाचा मुद्दाही चर्चेत आला होता. त्यातच उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार चार दिवसांच्या कार्यक्रमासाठी तब्बल ६३ हजार झाडे कापणार आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊमध्ये होणाऱ्या ‘डिफेक्स्पो’ या प्रदर्शनासाठी ही वृक्षतोड केली जाणार आहे.

देशातील अव्वल दहा सर्वाधिक प्रदुषित शहरांत लखनऊचे स्थान आहे. त्याच शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे कापली जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या डिफेक्सो प्रदर्शनासाठी जागा मोकळी करण्यासाठी गोमती नदीकाठची ६३ हजार ७९९ झाडे कापण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पुन्हा झाडे लावणार : एलडीए
डिफेक्स्पो प्रदर्शन संपल्यानंतर या ठिकाणी पुन्हा झाडे लावली जातील असा दावा लखनऊ विकास प्राधिकरणाने (एलडीए) केला आहे. तोडण्यात येणाऱ्या काही झाडांचे पुनर्रोपण करण्याचा विचार आहे. ही झाडे तोडण्याऐवजी दुसरीकडे पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव महापालिकेने पाठवला होता. मात्र सध्याच्या हवामानामध्ये झाडांचे पुनर्रोपण करणे शक्य नसल्याची माहिती एलडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. येत्या १५ जानेवारीपर्यंत या परिसरातील सर्व झाडे तोडून व्हावीत अशी सूचना एलडीएने केली आहे. तर ‘झाडांचे पुनर्रोपण केलं तर ती मरण पावतील. प्रदर्शन झाल्यानंतर नदीकाठची जमीन आणि झाडांची विशेष काळजी घ्यावी लागेल,’ असा सल्ला वरिष्ठ वन अधिकाऱ्याने दिला आहे.

काय आहे डिफेक्स्पो ?
लखनऊमध्ये पहिल्यांदाच डिफेक्स्पोचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये पायदळ, नौदल व अंतर्गत सुरक्षेशी संबंधित आधुनिक शस्त्रास्त्रे व उपकरणे पाहण्यास मिळणार आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या प्रदर्शनाचे आयोजन करणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा