पुणे : नवोदित अभिनेत्या विरोधात कटकारस्थान करून खोटी तक्रार देऊन ती मागे घेण्यासाठी त्याच्याकडून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री सारा श्रवणला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने मुंबईतून अटक केली. साराने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज शनिवारी फेटाळल्यानंतर तिला रविवारी सकाळी अटक करण्यात आली. तिच्या अटकपूर्व जामिनाला वकील मिलिंद पवार व अजय ताकवणे यांनी विरोध केला होता. साराला न्यायालयात हजर केले असता, तिला देश न सोडण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला.

अभिनेता सुभाष दत्तात्रय यादव याने याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात?फिर्याद दिली होती. त्यावरून ‘रोल नंबर १८’ या चित्रपटातील त्याची अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने, दहशतवादविरोधी पथकातील उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे आणि सराईत गुंड राम भरत जगदाळे यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर सारा ही दुबईला गेली होती. यामध्ये उपनिरीक्षक टेकाळे याने यादवला खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार २८ सप्टेंबर २०१८ रोजी जगदाळे याच्या सहकारनगर येथील कार्यालयात घडला होता.

रोहिणी माने व यादव यांनी ’रोल नंबर १८’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. यादव याच्या तक्रारीनुसार चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यादवला मिळत असलेली प्रसिद्धी रोहिणी व साराला पाहवली नाही. त्यामुळे रोहिणीने यादवला लग्न करण्यासाठी तगादा लावला. त्यानंतर आरोपींनी एकत्र येऊन यादवने वानवडी पोलिस ठाण्याच्या स्वच्छतागृहात रोहिणीची छेड काढल्याचा आरोप करून विनयभंगाची तक्रार दिली होती.

यादवने हा सर्व प्रकार पोलिस आयुक्तांच्या कानवर घातला. आयुक्तांकडे तक्रार गेल्याचे समजताच रोहिणी, टेकाळे व जगदाळे यांनी यादवला जगदाळेच्या कार्यालयात बोलावले. दाखल गुन्हा मागे घ्यायचा असेल तर, यादवने रोहिणीची पाया पडून माफी माग अशी धमकी दिली. माफी मागण्यास नकार दिल्यामुळे यादवच्या नातेवाईकांना तीन तास थांबवून त्यांच्या खुनाची व तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. त्यानंतर यादवच्या नातेवाईकांनी पाया पडून माफी मागितली. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद करून १५ लाखांची मागणी केली व पैसे न दिल्यास चित्रफीत पसरवण्याची धमकी देत १ लाख रूपये उकळले.

यादवने उरलेली रक्कम न दिल्याने आरोपींच्या सांगण्या-वरून साराने समाजमाध्यमावर प्रसारित करून बदनामी केली. सारा व रोहिणी या मैत्रिणी आहेत. सारा दुबईत वास्तव्यास असल्याने तिला अटक करता आली नव्हती. तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तिला अटक केली होती. दरम्यान, साराला रविवारी दुपारी न्यायलयात हजर केले असता, देश न सोडून जाण्याच्या अटीवर १५ हजारांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला. साराच्या वतीने वकील किशोर पाटील, आनंद बोत्रे, विराज करचे-पाटील यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक जयवंत जाधव पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा