मुंबई : राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यात येणार आहे. तसेच भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल आणि राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी त्यांच्या अभिभाषणातून दिली.

काल विधानभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिभाषण झालं. राज्यपालांनी त्यांचं संपूर्ण भाषण मराठीत केलं. यावेळी त्यांनी नव्या सरकारचे आणि निवडून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन करत नव्या सरकारचे भविष्यातील संकल्प मांडले. अवघ्या २० मिनिटांच्या या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शावर आमचं सरकार काम करेल, असं सांगतानाच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव देण्यात येईल. तसेच शेतकर्‍यांना कर्जमुक्तीच नव्हेतर चिंतामुक्त करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्यपालांनी दिली. मराठवाडा आणि विदर्भात शाश्वत पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येईल. मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाला विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अवकाळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातल्या ३४९ तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत केली जाईल. शेतकर्‍यांना कर्जमुक्त व चिंतामुक्त केले जाईल, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिभाषणात दिली. राज्य शासनाची सध्याची आर्थिक स्थिती दर्शविणारा वस्तुस्थितीदर्शक अहवाल जनतेसमोर मांडणार असल्याचे व ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व आर्थिक शिस्त आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असेही त्यांनी सांगितले.

स्वच्छ, पारदर्शक आणि निर्णयाभिमुख प्रशासनाची ग्वाही राज्यपालांनी यावेळी दिली. शेतकर्‍यांना पीक कर्जमुक्त व चिंतामुक्त करण्यासाठी राज्यशासन आवश्यक ती कार्यवाही करणार आहे. शेतमालाला योग्य भाव मिळण्याच्या दृष्टीने, मराठवाडा, विदर्भातील दुष्काळग्रस्त भागामध्ये शाश्वत पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने शासन उपाययोजना हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासगी क्षेत्रातील रोजगारांमध्ये भूमिपुत्रांसाठी ८० टक्के आरक्षण ठेवण्यासाठी कायदा करण्यात येणार असल्याचे सांगून राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, राज्य शासनातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया ही सुरु करण्यात येणार आहे. महिलांना समान संधी आणि त्यांची सुरक्षितता याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण मोफत देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. गरिबांना दोन वेळचे अन्न मिळावे यासाठी दहा रुपये इतक्या वाजवी दरात जेवणाची थाळी पुरवण्यासाठी शासन प्रभावी उपाययोजना करणार राज्यातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी स्वतंत्र तरतूद. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्याधर्तीवर एक नवीन योजना शासन सुरु करणार आहे.

एक रुपयात आरोग्य चाचण्या !
रोगनिदान चाचण्या करण्याकरिता तालुकास्तरावर एक रुपया क्लिनिक ही योजना सुरु करण्यात येणार असून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्या टप्प्याने अतिविशेषोपचार रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये शासन स्थापन करण्यात येणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.राज्यातील सर्व नागरिकांकरिता आरोग्य विमा छत्र पुरवण्यासाठी विविध आरोग्य विमा कार्यक्रमांचे एकत्रिकरण, राज्यातील संरक्षित गडकिल्ल्यांचे शासन जतन आणि संवर्धन, मुंबई येथे मराठी भाषा भवन, महान लेखक गायक, संगीतकार पु.ल.देशपांडे, ग.दि.माडगूळकर व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने गायन, लेखन अभिनय, एकपात्री विनोदी स्पर्धा इ. कार्यशाळांसह विविध कार्यक्रमांचे आयेाजन,महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या संबंधात दावा केलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेच्या हक्कांचे आणि विशेषाधिकारांचे संरक्षण आदी आश्वासनं राज्यपालांनी अभिभाषणात दिली आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा