मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बऱ्याच नाट्यमय राजकीय घडामोडी झाल्या. या नंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारने बहुमताच्या परीक्षेचा निर्णायक अडथळा आज यशस्वीरित्या पार केला. महाराष्ट्राचे नवे १९ वे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारवरील विश्वास ठराव जिंकला.

महाविकास आघाडी अस्तित्वात येण्याआधी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर पुढील सर्व विधिमंडळ कामकाज पार पडले. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. राज्यपालांच्या सूचनेनुसार बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले होते.

त्यानुसार सभागृह सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे कामकाज आटोपल्यानंतर काँग्रेसचे सदस्य अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे सरकारवरील विश्वासाचा प्रस्ताव मांडला. त्याला सत्ताधारी बाकावरील आमदार नवाब मलिक, जयंत पाटील व सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर आवाजी मतदान घेऊन शिरगणतीद्वारे मतदान घेतले. मतदान सुरू होताच भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर अध्यक्षांच्या सूचनेनुसार सभागृहाचे दरवाजे बंद करून गणती केली. विश्वास ठरावाच्या बाजूने १६९ मते आणि विरोधात शून्य मत मिळाले.

हे पक्ष राहिले तटस्थ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माकपचे प्रत्येकी एक आणि एमआयएमचे दोन असे चार सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे हा ठराव महा विकास आघाडी सरकारने १६९ विरुद्ध ० मतांनी जिंकला.

विश्वास दर्शक पूर्वी नेमके काय झाले
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने आपापल्या पक्षाच्या आमदारांसाठी व्हीप (पक्षादेश) जारी केला होता. ठाकरे मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश तिन्ही पक्षाच्या गटनेत्यांनी आमदारांना दिले होते.

शपथविधीवर प्रश्नचिन्ह
सभागृह सुरू होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमांना धरून अधिवेशनाबद्दल काही आक्षेप घेतले.अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रगीताने का झाली नाही?,अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांचे समन्स आहे का?, असे प्रश्न उपस्थित केले. हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीसांचे हे आक्षेप फेटाळले. हे अधिवेशन नियमाला धरून आणि कायदेशीरच आहे, असे वळसे-पाटील स्पष्ट केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा