सुरज ढवण

लातूर : राज्यातल्या राजकीय नाट्याला रोज वेगवेगळी वळणे लागत आहेत. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी शपथ घेतली असली तरी बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे हे सरकार टिकतं का महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होतं किंवा वेगळंच समीकरण अस्तित्वात येतं याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. राजकीय समीकरणांकडे राज्याचे लक्ष लागलेलं असताना लातूरकरांना मात्र लाल दिव्याची गाडी कोणत्या मतदारसंघाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

आजपर्यंत लातूर जिल्ह्याने काँग्रेसचे गटातटाचे राजकारण आणि मंत्रीपदासाठीची रस्सीखेच स्पर्धा अनुभवली आहे. आता तीच रस्सीखेच आणि राजकीय वजन वापरण्याचे सुत्र भाजपमध्ये दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाअंतर्गत विरोधक वाढवायचे नाहीत, त्यामुळे ते पुन्हा एकदा भाजपचे निलंगा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनाच संधी देऊ शकतात असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

मात्र आजपर्यंत फडणवीस यांचे धक्कातंत्राचे राजकारण बघता निलंगेकरांना डावलून फडणवीसांचे विश्वासू आणि औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे अभिमन्यू समर्थक विश्वासाने सांगत आहेत.

दुसरीकडे जर राज्यात फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले तर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते. अशा परिस्थितीत लातूर जिल्ह्यातून लातूर शहरचे आमदार अमित देशमुख हेच काँग्रेसकडून मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. पक्षातील प्रतिस्पर्धी बस्वराज पाटील मुरूमकर यांचा औसा मतदारसंघातून पराभव झाल्याने देशमुख यांचा मार्ग सुकर आहे.

त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत असल्या तरी लातूरमध्ये मात्र औसा, निलंगा आणि लातूर शहर यांपैकी लालदिवा कोणाला मिळणार याचीच चर्चा रंगताना दिसत आहे.

अजित पवारांचा नवा ‘ट्विट बॉम्ब’, राष्ट्रवादी भाजप युतीचा दावा

अजितदादांच्या ट्विटवर शरद पवारांचं स्पष्टीकरण

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा