पुणे : पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची बहुमताने निवड झाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश कदम यांच्या पराभव केला. उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड झाली आहे.

महापालिकाचे महापौरपद हे खुल्या वर्गासाठी आरक्षित असल्यामुळे भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आली होती. शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी निवडणूक प्रकिया पार पडली.

पुणे महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे महापौर भाजपचाच होणार हे निश्चित मानले जात होते. मात्र शिवसेनेकडून कोणाला मतदान करण्यात येणार याबाबत उत्सुकता होती. सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. महापौर पदासाठी दोन अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदानाची प्रक्रिया सुरू केली.

भाजप व आरपीआयच्या नगरसेवकांनी मुरलीधर मोहोळ यांना मतदान केले. त्यामुळे मोहोळ यांना एकूण 97 मते मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सभासदांनी प्रकाश कदम यांना मतदान केले. कदम यांना 57 मते मिळाली. मनसेच्या दोन्ही नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली. तर पाच नगरसेवक मतदानाला अनुपस्थित होते.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीठासीन अधिकारी दिवेगावकर यांनी मोहळ यांना विजयी घोषित केले. महापौरपदी निवड झाल्यानंतर भाजपकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी नवनिर्वाचित महापौरांचे अभिनंदन केले. यावेळी खासदार गिरीष बापट, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, आमदार भीमराव तापकीर, यांच्यासह मोहोळ यांचे नातेवाईक उपस्थित होते.

उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सरस्वती शेंडगे यांनी आघाडीच्या उमेदवार चाँद बी नदाफ यांचा पराभव केला. शेंडगे यांना 97 मते मिळाली तर चाँद बी नदाफ यांना 59 मते मिळाली.

वाचा : पाणीपुरवठ्यावरुन पालिकेत भाजप राष्ट्रवादीचे आंदोलन

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा