पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे 83 टक्के भुसंपादन पुर्ण झाले आहे. न्यायालयातील दावे, ऐनवेळी रोख मोबदल्याची मागणी यामुळे उर्वरीत भुसंपादन रखडले आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी शहरातील एका हॉटेलमध्ये अधिकार्‍यांची बैठक बोलावली आहे.

शहराचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकातील वाहतुककोंडी सोडविण्यासाठी या चौकात उड्डाणपुल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा उड्डाणपुल राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणामार्फत तयार केला जाणार आहे. मात्र या उड्डाणपुलाच्या कामासाठी आणि सर्व्हिस रस्त्यासाठी भूसंपादन करण्याची जबाबदारी महापालिकेला देण्यात आली आहे. या उड्डाणपुलाचे भूमीपूजन ऑगस्ट 2017 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. सहा महिन्यात पुलाचे काम सुरू करण्याचे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले होते. मात्र भूसंपादनात येणार्‍या अडथळ्यामुळे पावणे दोन वर्षे कोणतेच काम सुरू झालेले नाही.

या कामाासाठी 30.68 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार असून त्यापैकी 13.20 क्षेत्र हे राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात आहे. उर्वरित जमिनीपैकी 6.88 हेक्टर क्षेत्र हे महापालिकेचे आहे. तर, 10.60 क्षेत्रापैकी 2.24 हेक्टर जमिनीचे संपादन ‘एफएसआय’च्या मोबदल्यात, 2.36 हेक्टर जमीन ‘टीडीआर’च्या मोबादल्यात संपादीत करण्यात आली आहे, असे म्हणत 97 टक्के भूसंपादन झाल्याचा दावा प्रशासनाने वारंवार केला होता.

मात्र, यापूर्वी टीडीआर आणि एफएसआयच्या माध्यमातून मिळणाऱ्या मोबदल्यास सहमती देणाऱ्या अनेकांनी प्राथमिक प्रस्ताव मागे घेत रोख रकमेची मागणी केली आहे. तर बीडीपीमधील 12 ते 13 बाधितांनी बीडीपी झोननुसार मोबदला घेण्यास असमर्थता दाखवली आहे. याशिवाय काही जमिनीच्या मालकीचे दावे न्यायालयात प्रलंबीत आहेत. या सर्व कारणांमुळे आजवर 83 टक्केच भूसंपादन झाल्याचे एका वरीष्ठ अधिकार्‍याने सांगितले आहे.

या प्रकल्पासाठी राज्य सरकारने विशेष प्रकल्प म्हणून मान्यता देत 185 कोटींचे अनुदान दिले आहे. शासनाने पहिला हप्ता म्हणून 37.10 कोटी रुपये, दुसरा हप्ता म्हणून 37.10 कोटी पालिकेला दिले आहेत. ही रक्कम बाधितांना वाटण्यात आली असून पालिकेने आता तिसर्‍या 37.10 कोटीच्या हप्त्याची मागणी केल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पुण्याच्या महापौरपदी कोण?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा