मुंबई : राज्यातल्या सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येणार का नवे समीकरण उदयास येणार हे चित्र काही वेळात स्पष्ट होणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना संबोधित करताना, ‘आजपर्यंत आपण पालखीचे भोई होतो आता मात्र मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकच बसणार. महाराष्ट्रात आपलं सरकार बनणार,’ असं वक्तव्य केलं आहे. मुंबईतील मालाड परिसरातील हॉटेल द रिट्रीट येथे पक्षाच्या आमदारांशी उद्धव यांनी संवाद साधला.

यावेळी बोलताना ‘आपण अजूनही युती तोडलेली नाही’ असंही उद्धव म्हणाले आहेत. त्यामुळे युती होणार का शिवसेना दुसरा पर्याय निवडणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

मुख्यमंत्रिपदाच्या समान वाटपाच्या मुद्यावरुन भाजप शिवसेनेचे संबंध ताणले गेले होते. भाजपने मुख्यमंत्रीपद सोडण्याबाबत चर्चा झाली नसल्याचा दावा केला होता तर उद्धव ठाकरे यांनी चर्चा झाली असून सेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे अशी भूमिका घेतली होती. राज्याच्या राज्यपालांनी शनिवारी भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. भाजपच्या कोअर कमिटीतील नेत्यांच्या बैठकीनंतर भाजपची भूमिका स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा