वैष्णवी कुलकर्णी

कोणतीही व्यक्ती समाजमाध्यमांवर सक्रिय असेल तर तिची वैयक्तिक माहिती गुप्त राहू शकत नाही हे व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून झालेल्या हेरगिरीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. एवढंच नव्हे, तर व्यक्तीचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ तिचं वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करण्यास सक्षम असतो.

मध्यंतरी अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने फेसबुकच्या माध्यमातून हेरगिरी करून मतदारांना प्रभावित केल्याचं प्रकरण गाजलं होतं. त्यानंतर फेसबुकने आपल्या ग्राहकांची माहिती विकल्याचंही समोर आलं होतं. आता हेरगिरीसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे.

‘एनएसओ’ या इस्रायलच्या कंपनीने ‘पेगॅसस’ या स्पायवेअरची म्हणजेच हेरगिरी करू शकणार्‍या एका सॉफ्टवेअरची निर्मिती केली. एकदा हे सॉफ्टवेअर मोबाइल फोनमध्ये बसल्यावर- इन्स्टॉल झाल्यानंतर- पेगॅसस मोबाईल फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोन सुरू करून सगळी महत्त्वाची माहिती चोरू शकतं. या स्पायवेअरचा वापर करून भारतातल्या अनेक वकील, पत्रकार, आणि सामाजिक कार्यकर्त्यांची व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट्स हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आल्याचं उघडकीस आल्याने देशात अलिकडे मोठी खळबळ उडाली.

केवळ भारतीय व्यक्तींच्या बाबतीतच अशी हेरगिरी झाली नसून जगातल्या अनेक देशांमध्ये अशी हेरगिरी झाल्याचं उघडकीस आलं आहे. हेरगिरी करण्यात आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्राहकांची संख्या 1400 च्या वर असल्याची माहिती व्हॉट्स अ‍ॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी दिली. जगभरात सुमारे 1.5 दशलक्ष मोबाईल फोनधारक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देशात व्हॉट्सअ‍ॅप हॅक झालेल्यांमध्ये बस्तर, छत्तीसगडमधल्या मानवी हक्कांसाठी लढणार्‍या कार्यकर्त्या बेला भाटिया, बीबीसीचे माजी वार्ताहर शुभ्रांशु चौधरी, एल्गार परिषदेतल्या अनेकांचे खटले लढवणारे निहालसिंग राठोड, दलित आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे डिग्रीप्रसाद चौहान, नागरी हक्कांसाठी लढा देणारे आनंद तेलतुंबडे, परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण या विषयांचं वार्तांकन करणारे पत्रकार सिद्धांत सिबल यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. या सर्वांना व्हॉट्स अ‍ॅपकडून त्यांचं अ‍ॅप अपग्रेड करण्यासंबंधी मेसेज आले होते.

देशाच्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांची चिंता करत सरकारने व्हॉट्सअ‍ॅपकडे यासंदर्भात नेमकं काय घडलं आणि त्या विरोधात कंपनीने काय पावलं उचलली याची माहिती मागवली असल्याचं माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. व्हॉट्स अ‍ॅप कंपनीने यासंदर्भात एनएसओ या कंपनीवर अमेरिकेत खटला दाखल केला असून व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून जगातल्या अनेक पत्रकार, मान्यवर अधिकार कार्यकर्ते आणि इतरांवर पाळत ठेवल्याचा आणि त्यांच्याकडची गुप्त माहिती चोरल्याचा आरोप केला आहे.

विरोधकांनी या हेरगिरीसाठी मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे. पत्रकार, वकील, मानवी अधिकार कार्यकर्ते यांच्याबरोबरच विरोधी पक्षांच्या नेत्यांचेही व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ‘सरकारने व्हॉट्सअ‍ॅपला देशात पेगॅससची खरेदी कोणी केली हे विचारणं म्हणजे मोदींनी दसॉ कंपनीला राफेल विक्रीमध्ये कोणी पैसे कमावले असं विचारण्यासारखं आहे’ असं ट्वीट राहूल गांधी यांनी केलं आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटलं आहे की या प्रकरणात मोदी सरकार हेरगिरी करताना पुराव्यांसह पकडलं गेलं आहे. हे भयानक असलं तरी फारसं आश्चर्यकारक नाही. सर्वोच्च न्यालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करून सरकारला नोटीस पाठवावी. डाव्या पक्षांनीही या प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भात माहिती अधिकाराखाली दाखल केलेल्या अर्जावर उत्तर देताना गृह मंत्रालयाने हे स्पायवेअर कोणी खरेदी केलं याची माहिती नसल्याचं म्हटलं आहे. सरकारने विरोधकांचा आरोप खोडसाळपणाचा असून आपल्याला जनतेच्या खासगीपणाच्या अधिकाराबद्दल चिंता वाटत असल्याचं म्हटलं आहे.

एनएसओने तयार केलेलं पेगॅसस हे स्पायवेअर अँड्रॉइड, आयओएस आणि ब्लॅकबेरी या ऑपरेटिंग सिस्टिम्स वापरणार्‍या उपकरणांमध्ये दूरवरूनच इन्स्टॉल करता येतं. यासाठी एनएसओने ‘रिव्हर्स इंजिनियरिंग’ करून व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेच चालणारं एक अ‍ॅप्लिकेशन विकसित केलं आणि त्यातून लाकांचे फोन्स हॅक करू शकणारा कोड प्रसारित केला. मे महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ग्राहकांना एक मेसेज पाठवण्यात आला होता. त्यात व्हॉट्सअ‍ॅप ‘अपग्रेड’ करण्याची विनंती करण्यात आली होती. ग्राहकांनी त्यांचं अ‍ॅप अपग्रेड केल्यानंतर त्याच्या सुरक्षेत आपोआप एक त्रुटी निर्माण झाली आणि त्यातून या स्पायवेअरने ग्राहकांच्या मोबाईल फोन्समध्ये प्रवेश केला. फोन्स हॅक करू शकणारा कोड व्हॉट्स अ‍ॅपच्या सर्व्हरवरून 29 एप्रिल ते 10 मे या कालावधीत प्रसारित करण्यात आला आणि त्यात समाज, सरकार आणि राजकारणातल्या प्रभावशाली व्यक्तींना लक्ष्य करण्यात आलं.स्पायवेअर व्हॉट्सअ‍ॅप ग्राहकांच्या फोन्समध्ये इन्स्टॉल करण्यापूर्वी ग्राहकांना व्हिडिओ कॉलसारखा एक कॉल येई. पण तो व्हिडिओ कॉल नसे. फोनची रिंग वाजल्यावर ते स्पायवेअर नकळत त्या व्यक्तीच्या मोबाईल फोनमध्ये इंस्टॉल केलं जात असे. त्यासाठी त्या व्यक्तीने तो कॉल घेण्याचीही गरज नसे. 2016 मध्ये संयुक्त अरब अमिरातीतल्या एका सामाजिक कार्यकर्त्यावर झालेल्या हेरगिरीसाठी मदत केल्याप्रकरणी झालेल्या आरोपातून एनएसओ प्रसिद्धीला आली. एनएसओ मात्र आपण केवळ गुन्हेगारी आणि दहशतवाद यांच्याविरुद्ध लढा देण्यासाठी जगातल्या विविध देशांना हे स्पायवेअर देतो आणि त्याचा गैरवापर होऊ नये यावर लक्ष ठेवतो असा युक्तीवाद केला आहे.

पण अनेकांच्या मते या सॉफ्टवेअरचा वापर मानवी हक्कांसाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांविरुद्धच केला जातो. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या डॅना इंगलटन यांनी बाहरिन, संयुक्त अरब अमिराती आणि मेक्सिकोसारख्या अनेक देशांमध्ये मानवी हक्कांसाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांवर दडपण आणण्यासाठी, त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी आणि शिक्षा देण्यासाठी या स्पायवेअरचा वापर होत असल्याचं ताज्या प्रकरणावरून सिद्ध होतं असं म्हटलं आहे. अ‍ॅम्नेस्टी आणि इतर काही संघटनांनी इस्रायलच्या न्यायालयात एनएसओने हे तंत्रज्ञान इतर देशांमध्ये निर्यात करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी येऊन गेलेल्या अशा अनेक प्रकरणांप्रमाणेच हे प्रकरणही पुढे विस्मृतीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.पण सामान्य माणसाच्या खासगीपणाच्या हक्कांचं संरक्षण कोण करणार या प्रश्नाचं उत्तर कोण देणार हे एक कोडंच आहे.

नेमकं काय करतं पेगॅसस?
पेगॅसस हे स्पायवेअर कोणत्याही मोबाईलमधून कोणतीही माहिती चोरू शकतं. हे करताना त्याचा कोणताही पुरावा (इलेक्ट्रॉनिक ट्रेस) शिल्लक राहत नाही. शिवाय फोनच्या बॅटरी, मेमरी आणि डेटाचा कमीत कमी वापर केला जातो. हे केवळ एका ‘मिस्ड कॉल’मधून केलं जातं आणि त्या व्यक्तीने तो कॉल घेण्याचीही गरज नसते. आता घडलेल्या हेरगिरीसाठी पेगॅससने व्हॉट्स अ‍ॅपच्या ‘व्हिडिओ कॉलिंग’ फीचरचा वापर केला. चोरलेला डेटा पाठवण्यासाठी शक्यतो वायफायचा वापर केला जातो. वायफाय उपलब्ध नसेल तर जीपीआरएस, टूजी, थ्रीजी, फोेरजी आदी पर्यायांचा वापर केला जातो.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा